Tuesday 1 September 2020

काशिनाथ त्र्यंबक तेलंग


काशिनाथ त्र्यंबक तेलंग हे ब्रिटिश भारतातील न्यायाधीश, मराठी लेखक-संपादक, व सुधारक होते. ते इ.स. १८८५-८९ या कालखंडात अखिल भारतीय कॉंग्रेसचे चिटणीस होते. इ.स. १८८९ साली तेलंग मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले, तर इ.स. १८९२ साली मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले.

काशिनाथ तेलंग यांचा जन्म ३0 ऑगस्ट, इ.स. १८५0 रोजी गोकुळाष्टमीच्या दिवशी एका मध्यमवर्गीय सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. काशिनाथ यांच्या जन्मदात्या वडिलांचे नाव बापूभाई होते. त्यांना कृष्णराव व काशिनाथ ही दोन मुले होती. परंतु बापूभाई यांच्या मोठ्या बंधूंना-त्र्यंबक तेलंग यांनी मूलबाळ नव्हते. म्हणून त्यांनी काशिनाथ यांना दत्तक घेतले. वयाची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर काशिनाथ एका स्थानिक शाळेत जाऊ लागले. ते सुरुवातीला दिनकरपंत दाते यांच्या व नंतर महादेव पंतोजी यांच्या शाळेत जाऊ लागले. लहानपणापासूनच ते हुशार विद्यार्थी होते. काशिनाथ यांचे मराठी शिक्षण पूर्ण झाल्यावर ते नवव्या वर्षी एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये इंग्रजी विषय शिकण्यासाठी जाऊ लागले.शालेय जीवनात शैक्षणिक पुस्तकांशिवाय ते अवांतर पुस्तके देखील वाचत असत. शाळेत इंग्रजी व संस्कृत हे दोन विषय त्यांचे उत्तम होते.
इ.स. १८६४ साली काशिनाथ संस्कृत विषय घेऊन मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. संस्कृत ही भाषा घेऊन मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेले काशिनाथ व श्रीपाद ठाकूर हे पहिले विद्यार्थी होते. इ.स. १८६५मध्ये पुढील शिक्षणासाठी काशिनाथ एल्फिन्स्टन महाविद्यालयात जाऊन लागले. पहिल्याच वर्षी त्यांना ज्युनियर स्कॉलरशिप व त्याच्या पुढच्या वर्षी त्यांना सिनियर स्कॉलरशिप मिळू लागली. इ.स. १८६७मध्ये ते बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले व इ.स. १८६९मध्ये इंग्रजी व संस्कृत विषय घेऊन एम.ए. झाले. याच वर्षी ते एल.एल.बी.ची परीक्षा देखील उत्तीर्ण झाले. इ.स. १८६८मध्ये काशिनाथ तेलंग एल्फिन्सटन शाळेत संस्कृत शिक्षकाची नोकरी करू लागले. पण त्यांच्या वरिष्ठांनी लवकरच त्यांची नेमणूक एल्फिन्सटन महाविद्यालयात केली. तिथे काम करत असतानाच ते मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलीच्या परीक्षेची तयारी करत होते. इ.स. १८७२मध्ये ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले व मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसायाला सुरुवात केली. इ.स. १८७२-७३ साली तेलंग यांचे रामायण-होमर व गीता-बायबल या विषयांवरील निबंध प्रसिद्ध झाले. इ.स. १८८0मध्ये मुख्य न्यायाधीशांच्या शिफारशीवरून तेलंग यांना ठाणे येथे सह-न्यायाधीशाची जागा देण्यात आली होती पण त्यांनी ती नाकारली.
तेलंग यांना संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान होते. त्यामुळे न्यायालयात वकिली करताना विशेषत: हिंदू कायद्या संदर्भात याचा त्यांना फायदा झाला. इ.स. १८८९मध्ये न्यायाधीश नानाभाई हरिदास यांच्या निधनामुळे न्यायाधीशाचे पद रिक्त झाले व त्या पदावर काशिनाथ तेलंग यांनी नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे ते ३४ वे न्यायाधीश होते. स्त्रीशिक्षण, विधवाविवाह सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते. त्या दृष्टीने त्यांनी हिंदू कायद्यात सुधारणा केल्या.
इ.स. १८७0मध्ये तेलंग यांनी वयाच्या विसाव्या वर्षी शंकराचार्य यांचे चरित्र हा निबंध लिहून स्टु.लि.सा. सोसायटीमध्ये सादर केला. त्यांनी इ.स. १८७२मध्ये रामायणावर एक अभ्यासपूर्ण निबंध लिहून डॉ. वेबर यांनी रामायण काळासंबंधीचा मांडलेला सिद्धान्त खोडून काढला. त्याचप्रमाणे तेलंग यांनी भगवतगीतेवर अभ्यासपूर्ण निबंध लिहून लेरिंगेर याचे भगवद्गीते संबंधीचे प्रतिपादन तर्कशुद्ध पद्धतीने खोडून काढले. इ.स. १८७४साली तेलंग यांनी मुंबई सरकारसाठी भर्तृहरीची नीति आणि वैराग्य ही शतके एकत्र करून सटीप पुस्तक लिहिले व त्याला त्यांनी प्रस्तावना दिली. तसेच इ.स. १८८४साली त्यांनी मुंबई सरकारसाठी विशाखदत्त याच्या मुद्राराक्षस या संस्कृत नाटकाची सटीप आवृत्ती लिहिली. तेलंग यांना मातृभाषेचा फार अभिमान होता. त्यांनी स्थानिक राज्यव्यवस्था व शहाणा नेथन अशी दोन पुस्तके मराठीत लिहिली. इ.स. १८७७मध्ये त्यांची मुंबई विद्यापीठाच्या फेलोच्या जागी नेमण्यात आले. इ.स. १८८२मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे सिंडिक झाले. या पदावर ते दहा वर्षे राहिले व इ.स. १८९२ मध्ये त्यांची सरकारने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती केली.

No comments:

Post a Comment