Thursday 3 September 2020

दुर्मिळ वनस्पती:कवला (स्मिथिया)


कवला किंवा कवळा वनस्पती गवतवर्गीय असून, तिला पिवळी मनोहारी, सुंदर फुले येतात.ही पश्चिम घाटातील दुर्मीळ वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव स्मिथिया हि-सुता असे आहे. अत्यंत नाजूक असणारी ही फुले गालीच्या अंथरावा अशाप्रकारे भासतात. त्यांचा बहर एक वर्षाआड येतो. पाणथळ जागेत ही वनस्पती उगवते. पूर्वी पश्चिम घाटातील पठारे, माळ येथे मोठ्या संख्येने दिसणारी ही वनस्पती आता कमी प्रमाणात उगवते. त्यामुळे तिचा समावेश दुर्मीळ प्रजातींत केला गेला आहे. उन्हे कलायला लागले की ही फुले आणि पाने मिटून घेतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवतात. साधारण लाजाळूसारखी तीन ते चार पानांच्या जोड्यांची संयुक्त पाने असतात. या पानांमधून वर कळ्यांचा झुपका येतो. एक किंवा जास्त फुले एकावेळी फुलतात. हा फुलांचा बहर दोन ते तीन आठवडे जोरात असतो. नंतर शेंगा तयार होतात आणि त्या वाळून फुटतात. त्यातून पडलेल्या बियापासून पुन्हा पुढच्या वर्षी रोपे उगवतात. पिवळ्याधमक रंगांच्या या फुलांत लाल रंगाचा आकर्षक ठिपका असतो. त्यामुळे ती मिकी माउससारखी अनेक जणांना भासतात. त्यांना मिकी माऊस फ्लॉवर्स किंवा डोनाल्ड डक फ्लॉवर्स असेही म्हणतात. 'स्मिथिया' हे संशोधक सर जेम्स एडवर्ड स्मिथ यांच्या नावावरून घेतले आहे, तर त्याच्या खोडावर केसासारखी रचना दिसते, म्हणून पुढे हि-सुता जोडले गेले. मराठीत कवळा किंवा कवला नावाने ओळखले जाते. वनस्पती भारतात महाबळेश्वरात विपुल असून धारवाड, बेळगाव, सह्याद्री घाट, कारवार, बांदा येथेही बरीच आढळते. भारताबरोबर ते चीन, जपान, मलेशिया, उत्तर ऑस्ट्रेलिया या देशातही आढळते. हे झाड साधारण १५ ते ९० सेंटीमीटरपर्यंत वाढते. काही भागांत याच्या पानांची भाजी खात असल्याचा उल्लेख आढळला आहे. तसेच जमीन कसदार बनवण्यासाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते. स्मिथिया हि-सुता ही वनस्पती दहा ते बारा वर्षांपासून कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठ  परिसरात उगवते. या वनस्पतीच्या फुलांवर मधमाश्या, फुलपाखरे पाहायला मिळतात. यातून याचे पर्यावर्णीय महत्त्व अधोरेखित होते. या वनस्पतीमुळे परिसर तर आकर्षक दिसतो. ही वनस्पती दीपक (भूक वाढविणारी), उत्तेजक, सारक आणि मूत्रल (लघवी साफ करणारी) असून खोकला, पित्तविकार, काही नेत्रविकार इत्यादींवर गुणकारी आहे. पानांची भुकटी तपकिरीप्रमाणे नाकात ओढून नासिकास्त्राव वाढविण्यास पारतात; शर्करामेहावर (मधुमेहावर) गुणकारी; कीटकदंशावर लावण्यास उपयुक्त. ज्वरावर मुळांचा काढा देतात; मूळ वांतिकारक व कफोत्सारक असते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment