Thursday 10 September 2020

16 सप्टेंबर: ओझोन दिन


संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रम विभागाच्यावतीने 1995 पासून दरवर्षी 16 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा केला जातो. ओझोन थराच्या संरक्षणासाठी 1987 साली कॅनडातील मॉन्ट्रिएल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या.  ओझोनच्या थरास हानिकारक ठरणाऱ्या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा हा करार होता. आता ओझोन काय भानगड आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर पृथ्वीभोवती हा ओझोन वायूचा नैसर्गिक थर आहे. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांचा  बचाव होतो. ओझोनचा थर हा आपल्या अवकाशात एका नाजूक पातळ थरासारखा असतो. ओझोन हा फिक्कट निळ्या रंगाचा वायू असतो. ओझोनला एक तीव्र वास येतो. ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे  रासायनिक सूत्र 03 असे लिहितात. क्रिस्टियन  फ्रेड्रिक स्कोएनवेल या जर्मन-स्वीस वैज्ञानिकाने  1840 साली ओझोनचा शोध लावला. पृथ्वीच्या  वातावरणात रोज 300 मिलियन टन ओझोन तयार  होतो.  पृथ्वीपासून 16 ते 50 किमीच्या पट्ट्यात ओझोनचा थर आढळतो. हा थर निर्माण होण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू असते.मात्र, क्लोरोफ्लोरो कार्बन, क्लोरीन आणि ब्रोमीनसारख्या गॅसचा परिणाम ओझोनच्या थरावर होतो. अंटार्क्टिकजवळ ओझोनच्या थराला छिद्र आहे. याचा आकार हा रशिया आणि कॅनडा या देशांचे क्षेत्रफळ एकत्र केल्यानंतर जेवढे क्षेत्रफळ होईल, त्याहीपेक्षा अधिक म्हणजे  290 लाख चौकिमी इतकं मोठं आहे. नासाच्या वैज्ञानिकांच्या मते वातावरणातील ओझोन वायू नष्ट करणाऱ्या पदार्थांचा पृथ्वीवर इतका प्रयोग बनत चाललेला आहे की, काही दशकातच वातावरणातील ओझोन वायूचा थर 40 ते 50 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. मागील दोन दशकात ओझोनचा थर 2 ते 3 टक्क्यांनी कमी झालेला आहे. ओझोन थराचे संरक्षण करायचे असेल तर प्रदूषणाला आळा घालण्यासह जंगलाखालची भूमी सध्याच्या 3 ते 5 पट वाढविणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड करणे, सी.एफ.सी.सारख्या हानिकारक वायूचे नियमन करणे, वाहनातून निघणाऱ्या धुराचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे, यासारख्या उपाययोजना करणे जरुरी आहे. मित्रांनो, ओझोनच्या थराचा बचाव करण्यासाठी आपण सर्वांनीही हातभार लावायला हवा. शक्य तेवढा वाहनांचा प्रवास टाळावा. त्याशिवाय रासायनिक किटकनाशकांचा वापर थांबवायला हवा. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. हा दिवस आपल्याला पृथ्वीच्या पर्यावरणाला हानी पोहोचविण्यामध्ये मानवी घटक सहभागी असल्याची जाणीव करून देतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment