Saturday 26 September 2020

पांढरी-पिवळी शेवंती


भारतीय सण-उत्सवांमध्ये शेवंती फुलाला मानाचं स्थान लाभलेलं आहे. पण ही शेवंती एतद्देशीय नाही. ती मूळची चीनमधील आहे. तिथून पुढे ती जपानमध्ये रुजली आणि मग हळूहळू पाश्चिमात्य देशांत फोफावली. तशी भारतातही आली. चीनमधून जपानमध्ये गेलेल्या शेवंतीला तिथल्या राजमुद्रेवर स्थान मिळालं. 'फेस्टिव्हल ऑफ हॅपिनेस' चा भाग म्हणून जपानमध्ये 'नॅशनल क्रिसनथेमस डे'साजरा केला जातो. जागतिक पातळीवर या शेवंतीच्या अनेकरंगी जाती विकसित झाल्या आहेत. विविध देशांत या फुलांविषयी शुभ-अशुभ कल्पनाही भरल्या आहेत. युरोपमधील काही देशांत आणि खुद्द चीन-जपानमध्ये पांढरी शेवंती ही मृत्यूशी निगडित म्हणजे शोककारक मानली जाते. जर्मनीमध्ये ख्रिसमसला बाळ येशूचं स्वागत करण्यासाठी घर पांढऱ्या शेवंतीनं सजवलं जातं. अमेरिकेत सकारात्मक प्रसन्नतेचं प्रतीक म्हणून शेवंतीकडं पाहिलं जातं. शेवंती घरात आनंद आणि सुख आणते अशी धारणा फेंगशुईमध्ये आहे. भारतात मात्र शेवंतीशी उत्सवाची प्रसन्नता निगडित आहे.'शेवंती' या नावातच एक नटखट प्रतिमा दडली आहे. हार-वेण्या ते कट-फ्लॉवर्स अशा विविध पातळ्यांवर शेवंती वावरताना दिसते.  बहुरंगी बहुढंगी अशी ही शेवंती हारांत समर्पित, वेणीत सुशोभित होऊन जाते. तीच जर उच्चभ्रू वस्तीतल्या 'फ्लॉरिस्ट शॉप'मध्ये गेली की लगेच 'क्रिसनथेमस' होते. 

नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर शेवंतीचं तुरळक आगमन होतं. श्रावणात तर पिवळ्या फुलांची बहारच असते. तिथून विविध पिवळ्या फुलांची पखरण सुरूच असते. नवरात्रात शेवंती आणि झेंडूची फुलं यांना मोठा मान असतो. अश्विनात आलेली शेवंती निसर्गात अगदी मार्गशीर्षपर्यंत आपलं अधिराज्य गाजवते. हार, तोरणं यात शेवंती असतेच,पण तिचं महत्त्वाचं स्थान असते वेणीमध्ये! पांढरी-पिवळी रंगांच्या फुलांची वेणी खास विकली जाते. शेवंतीची लागवड प्रामुख्याने बिहार,गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, तामिळनाडू राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. आता पांढऱ्या-पिवळ्या शेवंतीशिवाय लाल, किरमिजी, गुलाबी,जांभळट,ब्राँझ अशा कितीतरी रंगछटांमधून शेवंती आपले रंग उधळताना दिसते. शेवंतीला उर्दूत गुलदाऊदी म्हणतात.दक्षिणेकडे सामंडी, असामीत चंद्रमुखी तर बंगालीत चंद्रमल्लिका म्हणतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment