Sunday 6 September 2020

विशाखापट्टणम: एक पोर्ट सिटी


पूर्वेला बंगालच्या खाडीवर पसरलेले सोनेरी वाळूचे लांबच लांब किनारे, हिरव्यागार-डोंगर-दऱ्यांचा तिहेरी वेढा आणि एका बाजूला स्वच्छ चमकणारा निळाशार समुद्र. यांच्यामध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक लेणं घेऊन उभं राहिलं आहे एक सुंदर शहर! आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम! 'पूर्व किनारपट्टीवरील गोवा' म्हणून ही याची ओळख आहे. विशाखापट्टणमचं निक नेम किंवा स्थानिक नाव आहे वायजॅग. निसर्गतःच लाभलेलं मोठं बंदर यामुळे त्याला 'पोर्ट सिटी' असंदेखील म्हणतात. जहाज बांधणीच्या पूर्वापार चालत आलेल्या कारखान्यांमुळे त्याला 'जहाज बांधणीचे माहेरघर' असेही आवर्जून म्हटले जाते.  'विशाखा' या युद्धदेवतेच्या विशाखापट्टणम नाव पडले, असे स्थानिक सांगतात. तर काही ठिकाणी राजा विशाख वर्मा यांच्या नावावरून हे नाव रूढ झाल्याचे म्हटले जाते. विशाखापट्टणम हे आंध्रप्रदेशातील हैद्राबाद आणि सिकंदराबाद या जुळ्या शहरानंतरचे (Twin cities) दुसऱ्या क्रमांकाचे मोठे  तर चेन्नई व कोलकाता शहरांनंतर पूर्वेकडील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तेलगू इथली मातृभाषा आहे. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विशाखापट्टणम हे देशातील मोठे बंदर म्हणून ओळखले जाते. सर्वात मोठी गोदी इथे आहे. आजदेखील या बंदरातून मोठ्या प्रमाणात व्यापार व दळणवळण होते. भारताच्या नकाशावर सुरक्षेच्या दृष्टीने या शहराचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. ब्रिटिश काळात दुसऱ्या महायुद्धात जपानने तर 1972 मध्ये भारत-पाक युद्धात पाकने विशाखापट्टणमला लक्ष्य केले होते. आजच्या घडीला मात्र भारतीय संरक्षण दलाचे ते हृदय आहे. कारण हे शहर पूर्व किनाऱ्यावरील भारतीय नौदलाचे पूर्वेकडील मुख्यालय आहे. त्याचबरोबर नौदल विज्ञान विभाग आहे. 

भारतीय बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंतची उभारणी इथे झाली. पोलाद कारखाने व इतर सार्वजनिक क्षेत्रातील अनेक सरकारी प्रकल्प येथे आहेत. औद्योगिक विकासात विविध खनिज उत्पादनदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडते. समुद्र किनारे,काली टेंपल (मंदिर), विशाखा म्युझियम पाहण्यासारखे आहे. येथील आणखी एक आयएनएस कुरुसुरा हे सबमरीन म्युझियम पाहण्यासारखे आहे. हे आशियातील अशा प्रकारचे पहिलेच म्युझियम आहे. सोव्हिएत बांधणीची आयएनएस कुरुसुरा ही 1969 मध्ये नौदलात रुजू झाली व 2001 मध्ये 31 वर्षानंतर भारताची अखंड सेवा केल्यानंतर तिचे रूपांतर म्युझियममध्ये करण्यात आले. म्युझिकल फाऊंटन असलेला वुडा पार्क, कृत्रिम बर्फावरील स्केटिंग, विनायक मंदिर,इंदिरा गांधी झूलॉजीकल पार्क पाहण्यासारखे आहेत. तेराव्या शतकातील 130 मीटर उंचीवरील कैलासगिरी येथील भव्य शंकर-पार्वती यांची शुभ्र मूर्ती विलोभनीय आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment