Wednesday 16 September 2020

कोकणी मेवा


सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडच्या उतरणीच्या डोंगररांगा आणि अरबी समुद्राचा किनारा यांच्यामधील चिंचोळा महाराष्ट्राचा भूप्रदेश म्हणजे कोकण.  कोकणात उसाचे किंवा द्राक्षांचे मळे फुलत नाहीत, पण कोकणचा मेवा इथे पुष्कळ प्रमाणात मिळतो. आंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे असा कितीतरी फळांचा मेवा इथे उपलब्ध आहे. कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते. नारळ आणि सुपारी हे कोकणातलं बारमाही पीक. हापूस आंबा हे कोकणचं अमृत फळ.  आता या फळानं जागतिक बाजारपेठेत काबीज केली आहे. झाडावर पिकलेला लालपिवळा भडक आंबा पिकून खाली पडल्यावर तो  मनसोक्त चुपून, अंगाखांद्यावर रस  सांडून खावेत, असे आता दिवस नसले तरी पूर्वी असा प्रकार खूप चालायचा.  खरे तर आता हापूसच्या कलमावरचा तयार झालेला आंबा ऐटीत पेटीत बसून ट्रकमधून मुंबईला जातो. तिथून जागतिक बाजारपेठेत पोहोचतो. हा हाफूस इथल्या बागायतदाराला उदंड पैसे मिळवून देतो. पावसाळ्यात खंडीने येणारे तांदळाचे पीक आता कमी झाले आहे. भातलावणीचा खेळ जगभर प्रसिद्ध आहे. रातांबा आणि चिंच ही फळे कोकणाच्या आंबट चवीची ओळख देतात. रातांब्याची सोलं आणि चिंचेचे गोळे सर्वदूर लोकप्रिय आहेत. काजू हा तर कोकणचा खास मेवा. काजूच्या झाडातून चमकणारी पिवळीशार किंवा लालभडक रंगाची काजूबोंड लक्ष वेधतात. त्याच्या खालच्या बाजूस काजू बी असल्याने आकारही आकर्षक असतो. बाजारात ओले काजूगरची उसळ चविष्ट असते. काही ठिकाणी काजूबोंडापासून बनविलेल्या सरबताची चवही चाखता येते.काजूगराबरोबरच काजूची पिकलेली लाल-पिवळी बोंड खाणं, ही अवीट गोडीची तहान ही तर कोकणची खासियत आणि कच्च्या काजूगरांची चव हे तर मे महिन्याच्या सुट्टीत पोरांचं कोकणातलं आकर्षण,  मार्च महिन्यात इतरत्र अभावानेच आढळणारी पांढरट पिवळी टपोरी तोरणीची फळे बाजारात येतात. आंबट-गोड चवीची ही फळे इथल्या विविधतेची ओळख करून देतात. रस्त्याच्या कडेला बसलेल्या माम्यांकडे मिळणारी बोरआवळेही कोकणात विशेषत्वाने आढळतात. हिवाळ्यात येणारी लालचुटुक कणेरी आणि हिरवी आंबट-गोड अळूची फळेदेखील बाजारात मिळतात.  डोंगर उतारावरच्या जमिनीमध्ये अनेक प्रकारची फळझाडे चांगल्या प्रकारे उभी राहतात. भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेतांना कोकणी माणसाने फळबागा उभ्या केल्यात. सोबत डोंगर उतारावर मोठ्याप्रमाणात निसर्गत: येणाऱ्या करवंद आणि जांभूळाच्या झाडांमुळे विपूल प्रमाणात फळे उन्हाळ्यात बाजारात येतात. कोकणातील गणपतीपुळे, कुणकेश्वर, सिंधुदुर्ग किल्ला ही कोकणातील महत्त्वाची पर्यटनस्थळं आहेत. मालवणी बोली आणि त्यातला गोडवा अवीट आहे. मालवणी भाषा बोलता येत नसली, तरी त्या बोलीवरचं आणि कोकणी मातीवरचं प्रेम सर्वदूर उदंड आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment