Wednesday 2 September 2020

चलनी नोटांचा इतिहास


नाण्यांचा इतिहास बराच जुना आहे. परंतु नाणी वजनी होऊ लागली ,तसतशी नोटा वापरण्याची पद्धत अधिक रूढ झाली. नाण्यांप्रमाणेच नोटांवरील छायाचित्रे, स्वाक्षऱ्या यांची माहितीही तितकीच रोचक ठरते. जगात चलनी नोटांचा उपयोग प्रथम चीनमध्ये इसवी सन 650 च्या सुमारास झाला. टॅन्ग साम्राज्याचा राजा सम्राट ह्यू युंग याच्या काळात प्रथम नोटा काढण्यात आल्या. मात्र त्यानंतर थेट इसवी सन 1368 मध्ये मिंग राजाने मलबेरी झाडाच्या सालीपासून बनवलेल्या कागदातून तयार केलेल्या नोटांचा उपयोग सुरू केला. या नोटा 13 बाय 9 इंच आकारात होत्या. त्याची छपाई उभी आहे. 'स्वर्गाच्या अधिपत्याखाली कायम चलनात राहणार' , असा मजकूर या नोटेवर होता. सन 1436 मध्ये चीनमध्येच बनावट नोटा छापण्यात आल्या होत्या. त्याचा विपरित परिणाम चलन फुगवट्यात झाला. त्यामुळे या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. पुढे सन 1651 मध्ये चीनमधील क्वान चांओ या राजाने नव्याने नोटा छापल्या होत्या. 

जगात सर्वप्रथम अधिकृतपणे बँकेमार्फत नोटा छापण्याचा मान वेस्ट स्वीडिश स्टॉकहोम बँकेला जातो. 16 जुलै 1661 रोजी या बँकेने नोटा छापल्या. या नोटेवर आठ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सन 1666 पासूनच्या नोटा आज अभ्यासकांस उपलब्ध आहेत. नाण्यांच्या वजनामुळे नोटांचा प्रचार वेगाने झाला. कारण त्या वजनाने हलक्या होत्या. साधारण 17 व्या शतकात आणि नंतर जगभरात नोटा वापरात आल्या. व्हर्जिनिया 1619, नार्वे 1695, डेन्मार्क व स्कॉटलंड 1717, फ्रान्स 1730, रशिया 1769, पोलंड 1797 अशा क्रमाने या देशांमध्ये नोटा वापरल्या जाऊ लागल्या.
भारतात ‘रुपया’ या शब्दाचा वापर सर्वांत पहिल्यांदा शेरशाह सूरीने त्याच्या शासनकाळात (1540-1545) केला होता.भारतात कागदी नोटांचा वापर 19व्या शतकातच सुरू झाला होता. त्याआधी ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या अधिपत्याखालील बंगाल प्रांतातही कागदी चलन वापरात आलं होतं. 30 नोव्हेंबर 1917 रोजी पहिल्यांदा एक रुपयाची कागदी नोट चलनात आली होती. इंग्लंडमध्ये छापण्यात आलेल्या या नोटांच्या दर्शनी बाजूला वर डाव्या कोपऱ्यात इंग्लंडचे राजे जॉर्ज पंचम यांची प्रतिमा असलेल्या नाण्याचा छाप आहे.1935 मध्ये मध्यवर्ती बँक म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेची स्थापना झाली आणि नोटा छपाईचे अधिकार रिझव्‍‌र्ह बँकेकडे आले. तेव्हापासून चलनी नोटांच्या छपाईची जबाबदारी रिझव्‍‌र्ह बँकेवर आहे. 1938 मध्ये भारतात दहा हजार रुपये मूल्याच्या चलनी नोटांची छपाई करण्यात आली होती. तर जानेवारी 1938 मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेकडून पाच रुपये मूल्याची पहिली चलनी नोट जारी करण्यात आली. या नोटीवर ‘जॉर्ज सहावे’ यांचे चित्र होते. याच वर्षात आरबीआयने चलनी नोटांचा विस्तार केला. भारतीय नोटांमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेशिवाय इतर 15 भाषांचा वापर होतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment