Saturday 19 September 2020

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी


दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले. १३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान १४२१ साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता, तर १४२२ मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्‍चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर १४३४ मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान ठेवले. नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेले हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखले जाते. नृसिंहसरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केले आहे. साधना, उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. नदीतीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलतीरावरील अमरेश्‍वर, कृष्णेचे विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो.

पहाटे तीनपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे. जरी हे हिंदूंचे पवित्र स्थान असले तरी विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे त्याला कळस नाही.  श्रीक्षेत्र नृसिंहवाडी कोल्हापूर जिल्हय़ात शिरोळ तालुक्यातील मिरजेपासून जवळ, कृष्णा - पंचगंगा संगम स्थळी आहे.

No comments:

Post a Comment