Friday 11 September 2020

'मंगळा'वरच्या मानवाच्या मोहिमा


माणूस मंगळावर जाण्याची आणि तिथे राहण्याची  महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. मंगळावर पूर्वी कधीतरी वाहतं पाणी तसंच वातावरण आणि कदाचित जीवसृष्टी तग धरू शकेल अशी परिस्थिती होती, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.1960 पासून ते आतापर्यंत मंगळावर तब्बल 45 अभियान करण्यात आले. ज्यापैकी एक तृतियांश अयशस्वी झालेत. भारताने अंतरिक्ष यान 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळाच्या कक्षेत पोचवले. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि युरोपियन युनियन यांनाच हे यश मिळाले आहे. आशियातील कोणत्याही राष्ट्राला मिळाले नव्हते, 2012 साली चीनने आपली पहिली मंगळ मोहीम यिंगह्यो-एफ या नावाने राबविली होती; पण ती असफल ठरली होती.  आता गेल्या 19 जुलै 2020 रोजी  अरब जगतातील पहिलंच' अमाल' (आशा) हे यान मंगळाच्या दिशेनं झेपावलं आहे. तसेच नासा'चे पर्सिव्हरन्स 30 जुलै 2020 रोजी अंतराळात गेलं आहे. ते पुढच्या वर्षी 18 फेब्रुवारीला मंगळावर उतरेल.  ‘नासा’ने 23 वर्षांपूर्वी, म्हणजे 1997 मध्ये  ‘पाथफाइंडर मिशन’मधून ‘सोजर्नर’ रोव्हर मंगळाच्या मातीवर उतरवलं. नंतर नासाने पुन्हा  2003 मध्ये मंगळावर ‘स्पिरिट’ आणि ‘ऑपॉच्र्युनिटी’ असे दोन जुळे रोव्हर पाठवले. त्यानंतर 2012 मध्ये ‘क्युरिओसिटी’ हा रोव्हर पाठवला.  आता ‘नासा’ने ‘पर्सिव्हरन्स’ हा रोव्हर मंगळावर पाठवला आहे. ‘नासा’ने मंगळावर ‘सोजर्नर’ हा रोव्हर तांत्रिक प्रात्यक्षिकं घेण्यासाठी पाठवलेला होता. त्याने मंगळावर तब्बल 83 दिवस काम केलं. तर ‘स्पिरिट’ आणि ‘ऑपॉच्र्युनिटी’ हे दोन रोव्हर्स तिथे अनुक्रमे सहा आणि 15 वर्षे कार्यरत होते. 2012 मध्ये मंगळावर उतरलेलं ‘क्युरिऑसिटी’ आजही कार्यरत आहे. मंगळावर पाठवण्यात आलेल्या रोव्हर्सच्या प्रत्येक पिढीगणिक (जनरेशन) शास्त्रीय उपकरणांची संख्या आणि गुंतागुंत वाढत गेली आहे. ‘सोजर्नर’ हा रोव्हर लहान मुलांच्या एखाद्या खेळण्यासारखा अगदी छोटासा होता. त्याच्या तुलनेत ‘स्पिरिट’ आणि ‘ऑपाच्र्युनिटी’ एखाद्या गोल्फ कोर्टाच्या आकाराचे होते. तर ‘क्युरिऑसिटी’ आणि ‘पर्सिव्हरन्स’ आकाराने एखाद्या लहानशा मोटारगाडीएवढे आहेत.  मंगळाभोवती फिरणाऱ्या यानातून मंगळावरच्या एखाद्या ठिकाणाची जी छायाचित्रं आणि त्यातून जी माहिती मिळते, त्यापेक्षा रोव्हर त्या ठिकाणाची किती तरी अधिक पट हाय रिझोल्यूशनची छायाचित्रं पाठवतात. रोव्हरमध्ये ड्रिलपासून ते स्पेक्ट्रोमीटर आणि मायक्रोस्कोपिक इमेजर्सपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं असतात. या उपकरणांच्या माध्यमातून मंगळाचा प्रत्यक्ष स्थानिक भौगोलिक परिसर समजून घ्यायला मदत होते.  

आता अलीकडेच पाठवण्यात आलेल्या ‘पर्सिव्हरन्स’ने मंगळावर ‘मॉक्सी’  हे एकदम आगळंवेगळं उपकरण नेलं आहे.  मंगळावरच्या वातावरणात भरपूर प्रमाणात असलेला कार्बन डाय ऑक्साइड वापरून या उपकरणाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मंगळावर ऑक्सिजन तयार केले जाणार आहेत. ही संकल्पना यशस्वी झाली तर पुढच्या मंगळ मोहिमा कमी खर्चात होतील.  दुसरं म्हणजे ‘पर्सिव्हरन्स’ने स्वत:बरोबर ‘इनजेन्यूटी’ हे हेलिकॉप्टर मंगळावर नेलं आहे. हे  हेलिकॉप्टर मंगळावरच्या विरळ वातावरणात उडून अशक्य ठिकाणची माहिती मिळवणार आहे. तिसरं म्हणजे या मंगळ मोहिमेच्या नियोजनानुसार ‘पर्सिव्हरन्स’ मंगळावरच्या दगडांचे नमुने घेऊन परत येणार आहे. त्या दगडांचं पृथ्वीवरच्या प्रयोगशाळांमध्ये विश्लेषण केलं जाणार आहे. आजवरच्या मंगळ मोहिमांमध्ये तिथले नमुने पृथ्वीवर आणण्याचा हा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. मंगळावर जीवसृष्टी आहे का किंवा यापूर्वी होती का याचा त्यातून शोध घेणं हा त्यामागचा हेतू आहे.  मानवजातीसाठी मंगळ हा अतिशय आकर्षक ग्रह आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तो तुलनेत सगळ्यात जवळ आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment