Wednesday 16 September 2020

प्रबोधनकार ठाकरे


केशव सीताराम ठाकरे (१७ सप्टेंबर १८८५ - २0 नोव्हेंबर १९७३). 'प्रबोधनकार ठाकरे' या नावाने महाराष्ट्राला परिचित असलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते व इतिहासकार. जन्म कुलाबा जिल्हय़ातील पनवेलचा. शिक्षण पनवेल व देवास येथे मॅट्रीकपर्यंत झाले. तथापि ज्ञानेच्छू वृत्तीने इंग्रजी-मराठी भाषांवर प्रभुत्व संपादन करून त्यातील उत्ताेमोत्तम ग्रंथांचे स्वतंत्रपणे अध्ययन त्यांनी केले होते. पनवेल येथे असताना केरळकोकिळकार कृ. ना. आठल्ये यांचा प्रेरक सहवास त्यांना लाभला. आठल्यांना ते आपले लेखनगुरू मानत होते. ठाकर्‍यांचा स्वभाव महत्त्वाकांशी आणि हरहुन्नरी होता. त्यांनी काही काळ सरकारी नोकरी केली. टंकलेखन, छायाचित्रकार, तैलचित्रकार, जाहिरातपटू, विमा कंपनीचे प्रचारक, नाटक कंपनीचे चालक असे अनेक उद्योगही केले. तथापि समाजसुधारणेची तळमळ होती. 

केशव सीताराम ठाकरे यांनी तळमळीतून केलेली झुंजार पत्रकारीता, तसेच प्रभावी वक्तृत्व व इतिहास संशोधन ही त्यांच्या कर्तृत्वाची ठळक वैशिष्ट्ये होत. महात्मा फुले, लोकहितवादी आणि आगरकर ही त्यांची स्फूर्तिस्थाने होती. राजर्षी शाहू महाराजांबद्दल त्यांना नितांत आदर होता. शाहू महाराजांच्या ब्राह्मणेतर चळवळीत ते हिरिरीने पडले; अस्पृश्यता निवारण, हुंडाविरोध, यासारख्या सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी आपली वाणी व लेखणी राबविली; ग. भा. वैद्यांच्या 'हिंदू मिशनरी सोसायटी'च्या कार्याला हातभार लावला. सारथी, लोकहितवादी आणि प्रबोधन या त्यांनी चालविलेल्या नियतकालिकांची नावेही बोलकी आहेत. त्यांपैकी खर्‍या राष्ट्रोद्धारार्थ 'सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीचा नायनाट' करण्यासाठी काढलेल्या प्रबोधनाशी त्यांचे नाव कायमचे निगडित राहिले. बहुजन समाजोद्धाराच्या आंदोलनांप्रमाणेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातही त्यांनी भाग घेतला; त्यासाठी तुरुंगवास भोगला; अभिनिवेशयुक्त पण अत्यंत सडेतोड, ठाशीव आणि प्रखर विदारक भाषा हे त्यांच्या वाणीलेखणीचे वैशिष्ट्य होते. कुमारिकांचे शाप ( १९१९), भिक्षुकशाहीचे बंड (१९२१) हे त्यांची सामाजसुधारणाविषयक उल्लेखनीय पुस्तके. खरा ब्राह्मण (१९३३), विधिनिषेध (१९३४) आणि टाकलेले पोर (१९३९) या त्यांच्या नाटकांतूनही त्यांच्यातील समाजसुधारक प्रकर्षाने व्यक्त झालेला आहे. 

मराठय़ांच्या इतिहासाचा त्यांना फार मोठा अभिमान होता. सातार्‍याच्या प्रतापसिंह महाराजांच्या पदच्युतीचा, इंग्रजांनी त्यांच्या केलेल्या अवहेलनेचा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी थेट लंडनपर्यंत गेलेला त्यांचा निष्ठावंत सेवक रंगो बापूजी यांच्या त्यागाचा साद्यंत इतिहास प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापुजी (१९४८) हा ग्रंथ लिहून महाराष्ट्रापुढे प्रथम त्यांनी मांडला. ग्रामण्याचा साद्यंत इतिहास ( १९१९), हिंदवी स्वराज्याचा खून (१९२२), कोदंडाचा टणत्कार ( दुसरी आवृत्ती १९२५) आणि रायगड (१९५१) ही त्यांची इतिहासविषयक अन्य पुस्तके. हय़ाखेरीज संत रामदास, संत गाडगे महाराज व पंडिता रमाबाई यांची चरित्रे त्यांनी लिहिली ( अनु. १९१८, १९५२, १९५0). संत रामदासांचे चरित्र इंग्रजीत लिहिलेले आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले. 

शिवसेना या राजकीय-सामाजिक संघटनेचे नेते, महाराष्ट्रातील विख्यात व्यंगचित्रकार आणि मार्मिक या साप्ताहिकाचे संपादक बाळासाहेब ठाकरे हे प्रबोधनकारांचे पुत्र होत. मार्मिकमधून माझी जीवनगाथा (१९७३) हे आपले आत्मचरित्र प्रबोधनकारांनी लिहिले. जुन्या आठवणी (१९४८) या त्यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध संस्मरणिका होत.

No comments:

Post a Comment