Monday 28 September 2020

नारळाच्या पानांपासून नैसर्गिक स्ट्रॉ


साजी वर्गीज बंगळुरूमध्ये राहतात.त्यांचं बालपण नारळाच्या झावळ्यांच्या सावलीखाली गेलं आहे. उच्च शिक्षण घेतल्यावर ते बंगळुरूमधील क्राइस्ट विद्यापीठात इंग्रजीचे अध्यापन करू लागले. शेतजमिनीशीनिगडित असलेल्या नवसंशोधनाला त्यांचं प्रोत्साहन असे. प्लास्टिकच्या वाढत्या वापरावरून त्यांना काळजी होती.त्यामुळे प्लॅस्टिकला पर्याय मिळेल आणि त्यातून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल, अशा गोष्टींकडे त्यांचं लक्ष होतं.एक दिवस ते विद्यापीठ आवारात फिरत असताना त्यांना नारळाची वाळलेली पानं पडलेली दिसली. त्यांनी ती पानं उचलली आणि चुरघळली. त्यांचा बारीक भुगा झाला. ग्रामीण भागात ही पानं उपयोगाची नाहीत,म्हणून कुठेही फेकून दिली जातात. त्यांनी त्याचा पर्यावरण उपयोग उत्पादन करण्याचे ठरवले. सरबत,ज्यूस किंवा अन्य शीत पेये पिण्यासाठी प्लास्टिकचे स्ट्रॉ वापरले जातात. त्यांनी या नारळाच्या वाळलेल्या पानांपासून स्ट्रॉ (पाईप) बनवण्याचा निर्णय घेतला. ती पूर्ण सुकलेली पानं गोळा करून घरी आणली आणि पाण्यात भिजू घातली. नंतर त्याला उष्णता देऊन उकळवले. पानांना चमक आल्याचं त्यांनी पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं की,नारळाच्या पानांमध्ये नैसर्गिक मेण असतं.यावर आणखी प्रयोग केल्यानंतर ते या निष्कर्षापर्यंत पोहचले की, यात जे मेण आहे, ते पानांना अँटी-फॅंगल आणि हायड्रोफोबिक बनवते. याच्या उपयोगातून त्यांनी स्ट्रॉ  बनवले.

सुरुवातीला स्थानिक भागांत साजी ही स्ट्रॉ 3 ते 10 रुपयांत विकत होते. काही दिवसांनी साजी यांनी बाजारात हे प्रोडक्ट लॉन्च केलं, त्यानंतर तब्बल 10 देशांमधून 20 लाखांपेक्षा जास्त स्ट्रॉ ची मागणी साजी यांना मिळाली. 2018 साली साजी यांनी आपल्या उत्पादनासाठी पेटंट मिळवलं आणि त्यांचं हे उत्पादन बाजारात सनबर्ड स्ट्रॉ म्हणून प्रसिद्ध झालं. 2017 साली त्यांनी सर्वात प्रथम एक पदर असलेली स्ट्रॉ तयार केली. पण त्यानंतर त्यांचे काही विद्यार्थी आणि इतर सहकाऱ्यांच्या साथीने स्ट्रॉचं उत्पादन बनवण्यासाठी घरातचं मशिनरी तयार केली. 

 प्लास्टिकला पर्याय म्हणून नारळाच्या झाडाच्या पानांपासून सुरक्षित आणि इकोफ्रेंडली स्ट्रॉचे उत्पादन सुरू केले,पण वर्गीस यांच्या या स्ट्रॉला देशातूनच नव्हे, तर परदेशातूनही मोठी मागणी येत आहे. पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या प्लॅस्टिकला पर्याय म्हणून वर्गीस यांचे इकोफ्रेंडली स्ट्रॉ जगभरात लोकप्रिय झाले. त्यांच्या या स्ट्रॉला सध्या अमेरिका, मलेशिया, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, फिलीपिन्स यांसारख्या देशांमधून मागणी आहे. या स्ट्रॉ सहा महिने टिकू शकतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment