Monday 7 September 2020

भाऊ दाजी लाड


भाऊ दाजी लाड हे मराठी इतिहास-अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते होते. लाडांचा जन्म १८२२ साली तत्कालीन पोतुर्गीज गोव्यात मांद्रे गावी, एका सामान्य सारस्वत कुटुंबात झाला. लाडांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते. बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले. इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाड मुंबईतल्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशन विद्यालयात दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या. या काळातच लाडांचे वडील वारले. वडिलांपश्‍चात त्यांनी आपल्या आईची व धाकटा भाऊ नारायण यांची जबाबदारी वाहिली. नारायण दाजी लाडदेखील शिकून पुढे डॉक्टर बनले. शालेय शिक्षणानंतर लाडांना एल्फिन्स्टन विद्यालयातच शिकवण्याची नोकरी मिळाली. या काळात त्यांनी प्राचीन संस्कृत वाङ.य अभ्यासले व संस्कृत साहित्यिकांच्या जीवनकाळाबद्दल, कालनिश्‍चितीबद्दल, तसेच गुप्तकालीन इतिहासाबद्दल त्यांनी मोलाचे संशोधन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला. १८५0 साली वैद्यकीचा अभ्यासक्रम पुरा करणार्‍या पदवीधरांच्या पहिल्या तुकडीत ते होते. १८५१ साली त्यांनी मुंबईत डॉक्टरकी आरंभली. वैद्यकीय पेशास अनुसरत त्यांनी वैद्यकीतही संशोधन केले. त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, र्जमनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले. सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विधवा पुनर्विवाह व स्त्रीशिक्षण यांविषयीच्या उपक्रमांना त्यांनी पाठबळ पुरवले. मुंबईतील प्रशासकीय, राजकीय सुधारणांमध्येही त्यांनी स्वारस्याने सहभाग घेतला. १८६९ व १८७१ सालीं अशा दोन वेळा ते मुंबईच्या नगरपालपदासाठी निवडले गेले. ३१ मे, १८७४ रोजी लाडांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment