Sunday 20 September 2020

प्रा.सदानंद रेगे


दक्षिण कोकणातील देवगडच्या लाल मातीने मराठी साहित्याला अनेक हिरे-माणके बहाल करून आपली साहित्यसंपदा समृद्ध करण्यास हातभार लावला. त्या पैकीचे एक म्हणजे आधुनिक युगातील कवी, कथाकार, अनुवादक प्रतिभावंत चित्रकार प्रा. सदानंद शांताराम रेगे! सुप्रसिद्ध कादंबरीकार कै. श्रीपाद काळे यांच्या वाडा-पडेल या गावा लगतचे पुरळ हे रेगेंचे मूळ गाव.

रेगेंचा जन्म २१ जून १९२३ रोजी त्यांच्या आजोळी राजापूर येथे झाला. परंतु पुढील आयुष्य मात्र मुंबईत गेले. त्यांच्या वयाच्या १२व्या वर्षीच म्हणजे १९३५ मध्ये डिसेंबर महिन्यात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे बालपण दादर-माटुंगा परिसरात गेल्याने शिक्षण तेथेच झाले. त्यांना चित्रकला चांगली अवगत होती. १९४0 साली छबिलदास हायस्कूलमधून मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण सुरू होते. दोन भाऊ, दोन बहिणी व आई असे पाच जणांचे कुटुंब सांभाळताना शिक्षण सोडून नोकरी पत्करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. कृश शरीरयष्टी लाभलेले रेगे १९४२ साली गिरणीत डिझायनरचे काम करून आपले शिक्षणही घेत होते.

१९५८ मध्ये सिद्धार्थ महाविद्यालयातून मराठी विषय घेऊन बी. ए. ची पदवी तर १९६१ मध्ये कीर्ती महाविद्यालयातून इंग्रजी विषयातील एम ए. उत्तीर्ण झाले. पुढे प. रेल्वेत बराच काळ नोकरी केल्यावर १९६२ पासून १९८२ सालापयर्ंत सुमारे २0 वर्षे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुईया महाविद्यालयात कवी विंदांसोबत नोकरी केली. दोघांचेही वास्तव्य वांद्रे येथील साहित्य सहवासमध्येच होते. वयाच्या १0व्या वर्षी ४थीत असताना भक्त ध्रुव ही १0 मिनिटांची नाटिका लिहून त्यांनी आपल्या लेखनाला प्रारंभ केला. तर गांधी वधानंतर प्रतिकात्मक कविता लिहून काव्य लेखनाचा श्रीगणेश केला. प्रतिभेची वेगळी सनद लाभलेल्या या अवलियाने नंतर मागे वळून पाहिजेच नाही.

एक प्रथितयश कथा व ललित लेखक, कवी, अनुवादक तसेच आदर्श वाचक म्हणून त्यांची ख्याती होती. जाहिरातींचे भाषांतर करणे, नाटयपरीक्षण व आकाशवाणीसाठी त्यांनी खूप लेखन केले. पोपटांना बोलते करण्याची कलाही त्यांना अवगत होती. त्यांचा स्वभाव काहीसा एकलकोंडा, विक्षिप्त, हसतमुख असा होता. चित्रकलेच्या प्रांतात त्यांना आचरेकर, बेंद्रे, आंबेरकर, सोलेगावकर, कुलकर्णी व दलाल या मातब्बर चित्रकारांचे मार्गदर्शन लाभल्याने ते चित्रकार बनले. शालेय जीवनात प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. रवींद्र रामदास व मराठीतील अ. वि. काळे हे गुरुजन तसेच प्रभाकर पाध्ये भेटल्याने त्यांच्या लेखनास एक दिशा मिळाली. १९५१ साली धनुधर्ाी या मासिकात त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाल्यावर सत्यकथा, झंकार, चित्रा, अभिरुची, यशवंत व हंस या नियतकालिकांमधून त्यांनी चौफेर लेखन केले. पुढे साहित्यिक जीवनातील कोंडमार्‍यावर मात करीत प्रभाकर पाध्येंच्या पुढाकाराने त्यांनी युरोपचा दौराही केला. नॉर्वेजियन भाषा अवगत करतानाच रशियाचाही दौरा केला. मोहन पालेकर यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतलेल्या रेगे यांनी नवनाटयशास्त्र सहज शिकून त्यात पारंगत झाले. मुंबईच्या आकाशवाणी केंद्रावरील रविंद्र पिंगे व नीलम प्रभू यांचा परिचय झाल्याने आकाशवाणीशी त्यांचे ऋणानुबंध होते.

प्रा. रेगेंची साहित्य संपदेत प्रामुख्याने अक्षरवेल (१९५७), गंधर्व (१९६0), देवापुढचा दिवा (१९६५), वेडया कविता व ब्रांकुशीचा पक्षी (१९८0), पँट घातलेला ढग (१९८१) व तृणपर्णे (१९८२) हे काव्यसंग्रह तर जीवनाची वस्त्रे (१९५२), काळोखांची पिसे (१९५४), चांदणे (१९५९), चंद्र सावली कोरतो (१९६३), मासा आणि इतर विलक्षण कथा (१९६५) हे काव्यसंग्रह यांचा अंतर्भाव होतो. विदेशी अनुवादित नाटकांमध्ये जयकेतू (१९५९), ब्रांद (१९६३), ज्याचे होते प्राक्तन शापित (१९६५), बादशहा (१९६५), गोची (१९७४) व राजा इडिपस आदी तर अप्रकाशित नाटकांमध्ये पाच दिवस थेर्मा व प्रेषित यांचा अंतर्भाव होता.

No comments:

Post a Comment