Sunday 6 September 2020

कृषी पर्यटन


भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे कृषी पर्यटनाला आपल्या देशात चांगला वाव आहे. देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात कृषी पर्यटन सुरू झाले. दहा वर्षांपूर्वी राज्यात फक्त 20 ते 25 कृषी पर्यटन केंद्रे सुरू होती, आज हाच आकडा 500 च्यावर गेला आहे. यातील काही केंद्रे देशभर प्रसिध्द झाली आहेत. यांची आर्थिक वार्षिक उलाढाल1 कोटीच्या आसपास गेली आहे. ग्रामीण भागात रोजगाराचे एक चांगले  साधन आहे. महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (मार्ट) या संस्थेमार्फत कृषी पर्यटन विकासासाठी प्रयत्न केले जातात. अलीकडे शहरी भागातील लोकांचा एक सर्व्हे करण्यात आला होता,त्यात 42 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांचे ग्रामीण भागात कुणीच नातेवाईक नाहीत. शहरी लोकांना ग्रामीण भागाची आणि शेतीची ओढ आहे. त्यामुळेच कृषी पर्यटन पुढच्या काळात आणखी बहरेल, अशी आशा आहे. 

कृषी पर्यटन केंद्रात पर्यटकांना राहण्यासाठी कौलारू छपरांची घरे, गाईच्या शेणाने सारवलेली जमीन आणि घराभोवती स्वच्छता महत्त्वाची आहे. इथली चुलीवरची भाकरी, भरलेले वांगे, भरीत वांगे, पिठले,उसळी, चटण्या, खरडा, दही-ताक, तूप याशिवाय गावरान मटण शहरी लोकांना तृप्त करते. अशा केंद्रातून शेतीतून मिळणारी अन्नधान्ये, फळे, भाजीपाला, फुले, औषधी वनस्पती यांचे संवर्धन केल्यास पर्यटकांना शेतीची चांगली माहिती मिळू शकते. भरपूर झाडे असल्याने प्राणी-पक्षी यांचा सहवास ,आनंद घेता येतो. शेतीला लागणारे वेगवेगळी औजारे, ट्रॅक्टर,रोटावेटर, बैलगाडी, कोळपे, कुळव, खुरपे, नांगर, फावडे,चाबूक अशा वस्तूंची ओळख होईल. 

अलीकडच्या काळात शेतीत आलेले आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीत झालेला बदल पर्यटन केंद्रात दिसल्यास पर्यटकांना या शेतीचा प्रवास जाणून घेण्यास मदत होते. ऑइल व विद्युत मोटार, हरितगृह, शेततळे, ठिबक-तुषार सिंचन, गांडूळ खतनिर्मिती, विद्युत कुंपण, इतर कुंपण ,सौर उर्जेवरची शेती याची उपलब्धता पर्यटकांना शेतीकडे आकृष्ट करू शकते. गच्चीवरच्या शेतीसाठी मार्गदर्शन मिळू शकते. जुन्या काळात किंवा आजही ग्रामीण भागात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि शहरातील नित्योपयोगी वस्तू यातून मानवी जीवन विकास समजून घेता येईल. उदाहरणार्थ बघा- उखळ, चूल, शिंकाळे, जाते, खुराडा, पाटा-वरवंटा, मोट, खलबत्ता, रवी, डाव, मडकी या दुर्मिळ वस्तू पाहायला मिळतील. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची माहिती होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे  शहरी मुले दूध गवळी देतो किंवा भुईमुगाच्या शेंगा झाडावर लागतात, अशी विनोदी उत्तरे देणार नाहीत. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment