Monday 7 September 2020

सौंदर्य आणि गोरेपणा


सौंदर्य हे बघणार्‍याच्या दृष्टीत आणि स्वभावात असले पाहिजे. रंगावरून माणसे ओळखणार्‍यांच्या यादीत तरुणाईने आपले नाव का जोडावे, हेच कळत नाही. आज बॉलिवुड मध्ये काजोल, कोंकना सेन, दीपिका पदुकोन, प्रियांका चोप्रा, ईशा गुप्ता, मुग्धा गोडसे, लारा दत्ता, मलायका, बिपाशा, सुश्मिता सेन, रेखा, चित्रांगदा सेन, नंदिता दास, मराठीत सई ताम्हणकर, मेघा घाडगे, पल्लवी सुभाष, अमृता सुभाष, उषा जाधव अभिनयाच्या क्षेत्रात गाजलेली अशी कित्येक नावे घेता येतील. शिवाय शीतल मल्हार, मधू सप्रे, मेहर यातर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आघाडीच्या मॉडेल्स म्हणून यशस्वी राहिल्या. त्यांचा वर्ण गोरा नाही म्हणून त्यांचे कुठे काही अडले नाही की बिघडले नाही तर, आपले घोडे कसे काय अडेल?

यातलेच एक सकारात्मक उदाहरण द्यायचे झाले तर ते चित्रांगदा सेन या अभिनेत्रीचे देता येईल. तिने लाखो रुपयांची एका फेअरनेस क्रीमची जाहिरातही एकदा नाकारली होती. त्या वेळचे तिचे वक्तव्य होते, मला माझा हा सावळा रंग खूप प्रिय आहे. हीच माझी ओळख आहे. त्वचेच्या रंगावरून माणसे ओळखणार्‍या लोकांच्या यादीत मला माझे नाव नको आहे.

जगभरात सर्वात जास्त फेअरनेस क्रीम घेणारा भारत हा एकमेव देश असून हे मार्केट प्रचंड मोठे असल्याचे एका सर्वेक्षणातून अलीकडेच समोर आले. मुळात इथे सौंदर्याची गोरेपणाशी जोडली गेलेली व्याख्या नि मानसिकता बदलण्याची गरज आहे. याला विज्ञानाचा आधार देऊन सांगायचे झाले तर, आपण भारतीय वंशाचे लोक गोर्‍या रंगाचे होऊ शकत नाही. कारण आपल्या गुणसूत्रातच हा गव्हाळ किंवा सावळा रंग आहे. दुसरे म्हणजे आपल्या देशात सूर्यप्रकाशही खूप असतो. त्यामुळे आपल्या त्वचेचा रंग असाच असणे ही नैसर्गिक गरज आहे. विशेष म्हणजे गव्हाळ किंवा सावळ्या रंगाची त्वचा ही वैद्यकीयदृष्टय.ाही सर्वात निरोगी त्वचा मानली जाते. कारण यात मॅलनीन या रंगद्रव्याचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे सूर्यप्रकाशात अतिनील किरणांपासून आपले संरक्षणही होते. याउलट गोरी त्वचा ही मूळची रोगी समजली जाते. कारण यात मॅलनीन या रंगद्रव्याचा अभाव असतो.आपला गोरेपणाचा हव्यास कमी करण्याला आपल्या करिअरमध्ये ज्यांनी यशाची उच्चतम पायरी गाठली अशी वरील उदाहरणे नक्कीच कारणीभूत ठरतील, हा आशावाद. आपली ओळख ही आपली कला, गुण, स्वभाव, आपले वागणे-बोलणे, विचार आणि ते मांडण्यासाठीचा आत्मविश्‍वास यातून समोर येत असते. आणि समोरच्यांच्या कायमची लक्षातही राहत असते. यशस्वी होण्यासाठी रूपाची नव्हे टॅलेण्टची आवश्यकता असते. 

No comments:

Post a Comment