Monday 1 October 2018

जागतिक हरित यादीत भारत १७७ व्या स्थानावर

विकासदराच्या आघाडीवर भारत आगामी काळामध्ये चीनला मागे टाकेल, असे चित्र निर्माण झाले असताना पर्यावरण संतुलनाच्या आघाडीवर मात्र भारताची अत्यंत असमाधानकारक कामगिरी समोर आली आहे. जगातील १८0 देशांच्या यादीमध्ये हरितमूल्यांकनात भारताची घसरगुंडी उडाली आहे. गेल्या दोन वर्षांत १४१ व्या स्थानावर असलेला भारत आता १७७ व्या स्थानावर जाऊन तळातील पाच देशांच्या पंक्तीमध्ये गेला आहे. या स्थितीला भारतातील वायू प्रदूषणाने गाठलेली अत्युच्च पातळी आणि बेसुमार जंगलतोडीला जबाबदार धरण्यात आले असून, या स्थितीवर तातडीने उपाययोजना झाली नाही, तर सार्वजनिक आरोग्याचे मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशी धोक्याची सूचना देण्यात आली आहे.
स्वित्झलर्ंड येथील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक अर्थमंचाच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) बैठकीत जागतिक पर्यावरणीय प्रगती मूल्यांकनाची यादी (ग्लोबल एन्व्हायर्मेंटल परफॉर्मन्स इंडेक्स (ईपीआय)) प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये भारताची अत्यंत निराशाजनक कामगिरी समोर आली असून भारत, चीन आणि पाकिस्तान या देशांना हवेच्या प्रदूषणाच्या पातळीने मोठा झटका दिल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या यादीमध्ये पर्यावरणाविषयी अत्यंत संवेदनशील असलेल्या आणि यामुळेच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारा स्वित्झलर्ंड हा देश पहिल्या स्थानावर आहे. त्याखालोखाल फ्रान्स, डेन्मार्क, माल्टा, स्वीडन या देशांनी आपले स्थान पटकावले आहे. ईपीआय इंडेक्सिंगसाठी जगातील १८0 देशांचे तेथील समस्यांच्या कसोटीवर दहा विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते आणि पर्यावरणीय आरोग्य व जैवविविधतेची सुदृढता यावर आधारित एकूण २४ निकषांवर तपासणी करण्यात आली. यामध्ये हवेची गुणवत्ता, पाणी आणि सांडपाण्याची निर्गत, हवेतील कार्बन संयुगांचे प्रमाण, जंगलतोड आणि सांडपाण्यावरील प्रक्रिया आदींचा समावेश होता.
हा अहवाल अमेरिकेतील येल व कोलंबिया विश्‍वविद्यालयाच्या वतीने आणि जागतिक आर्थिक मंचाच्या सहकार्याने प्रत्येक दोन वर्षांनी तयार करण्यात येतो. या अहवालात भारत आणि चीन या लोकसंख्याबहुल राष्ट्रांमध्ये घसरलेल्या मूल्यांकनास लोकसंख्या वाढीचा वेग आणि पर्यावरणावर झालेला आर्थिक विकासाचा परिणाम जबाबदार असल्याकडे लक्ष वेधले आहे.

   

No comments:

Post a Comment