Friday 26 June 2020

1983 च्या विश्व चषकाच्या आठवणी

25 जून 1983 या दिवशी क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणार्‍या लॉडर्सच्या मैदानावर भारतीय संघाने बलाढय वेस्ट इंडिजला नमवण्याचा पराक्रम करुन दाखवला. या एका विजयामुळे पूर्ण भारतीय क्रिकेटचाच चेहरा-मोहरा बदलून गेला.37 वर्षांपूर्वी लॉडर्सच्या मैदानावर कपिलदेव यांच्या संघाने इतिहास घडवला होता. अशक्य वाटणारी गोष्ट साध्य करुन दाखवली होती. त्यावेळी भारतीय संघ अशी कामगिरी करुन दाखवेल याची कोणीही कल्पना केली नव्हती. पण कपिलदेव यांच्या संघाने सर्वांनाच धक्का देत पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.  भारतीय क्रिकेट संघ 1983 साली विश्वचषक खेळायला इंग्लंडला गेला. त्यावेळी आपण विश्वविजेते बनू असे त्या संघालाही वाटले नव्हते.
1983 च्या आधी भारतीय क्रिकेट संघ दोन वर्ल्डकप स्पर्धांमध्ये खेळला होता. त्यावेळी त्यांना फक्त एक सामना जिंकता आला होता. 1975 च्या विश्वचषकात भारताने फक्त पूर्व आफ्रिकेच्या संघावर 10 बळींनी विजय मिळवला होता.  आधीच्या दोन विश्वचषकाच्या अनुभवामुळेच संघाला आपण विश्वविजेते बनू याची खात्री नव्हती. आजचा भारतीय संघ विश्वचषक नव्हे तर कुठल्याही दौर्‍यावर जातो. त्यावेळी संपूर्ण कोचिंग स्टाफ त्यांच्यासोबत असतो. यामध्ये फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणाबरोबरच मुख्य प्रशिक्षकही त्यांच्यासोबत असतात. ते संघाला काही कमी पडू नये, यासाठी मेडिकल स्टाफही सोबत असतो. यामध्ये डॉक्टर, फिजियो सुद्धा सोबत असतात. पण 1983 साली भारतीय संघ विश्वचषक खेळायला गेला. त्यावेळी डॉक्टर, फिजियो, हेड कोच असे कोणीही त्यांच्यासोबत नव्हते. फक्त पीआर मान हे संघाचे मॅनेजर सोबत होते. प्रशिक्षक नसल्यामुळे त्यावेळी मोहिंद अमरनाथ कपिल देव सोबत मिळून संघाची फलंदाजी, गोलंदाजी आणि नाणेफेकीबद्दल निर्णय घ्यायचे. कपिल देव यांची पत्नी सामना सुरु असतानाच स्टेडियममधून निघून गेली होती. कपिल देव यांनी 1980 साली रोमी भाटिया यांच्याबरोबर विवाह केला. 1983 वर्ल्डकपच्या वेळी रोमी भाटिया या लंडनमध्येच होत्या. रोमी या अंतिम सामना पाहण्यासाठी लॉडर्सवर उपस्थित होत्या. भारताची फलंदाजी पाहून त्या प्रचंड निराश झाल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना भारताला फक्त 183 धावाच बनवता आल्या. स्टेडियममध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला मोठा प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे रोमी या सामना सुरु असतानाच आपला पास दुसर्‍याकडे सोपवून स्टेडियममधून बाहेर पडल्या. काही वेळाने भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना बाद करणे सुरु केले. ज्यावेळी रोमी यांना हे समजले, तेव्हा त्यांनी पुन्हा स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण पास नसल्यामुळे त्यांना आत सोडले नाही. साखळी फेरीत भारताचा झिम्बाब्वे बरोबर सामना होता. भारतासाठी हा सामना खूप निराशाजनक होता. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या संघाने 235 धावा केल्या होत्या. भारताची सुरुवात खूप खराब झाली होती. नऊ रन्सवर भारताच्या चार विकेट गेल्या होत्या. त्यावेळी कपिलदेव यांनी 175 धावांची दमदार खेळी केली व एकटयाच्या बळावर हा सामना जिंकून दिला. पण त्या दिवशी बीबीसीचा संप असल्याने कपिल यांच्या ऐतिहासिक खेळीचे रेकॉर्डींग होऊ शकले नाही.

No comments:

Post a Comment