Thursday 18 June 2020

शिवसेनेची स्थापना

मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली अनेक वर्ष आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती.
मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ५४ वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला.
फ्री प्रेस र्जनल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. आपल्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची स्थापना करणार्‍या बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. लहानपणापासूनचे प्रबोधनाचे संस्कार, दिवसागणिक मनावर कोरली जाणारी स्वातंत्र्यलढयाची गाथा आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राची प्रखर चळवळ यांतून बाळासाहेबांची वैचारिक दिशा स्पष्ट होत गेली, आणि बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास येऊ लागले. १९६0 मध्ये फ्री प्रेस मधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून बाळासाहेबांनी स्वत:चे मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले, आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हक्काची पहिली लढाई सुरू झाली. मुंबईतील परप्रांतीयांमुळे मराठी माणसाच्या भूमिपुत्र म्हणून असलेल्या हक्कांवर गदा येत असल्याची आरोळी मार्मिकमधून घुमली आणि बाळासाहेब ठाकरे या नावाचे मराठी मनांवरील राज्य सुरू झाले. मराठी माणसावरील अन्याय केवळ व्यंगचित्रे काढून दूर होणार नाही, त्यासाठी अधिक संघटित प्रयत्न हे वास्तव जाणलेल्या बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना काढण्याचा निर्णय घेतला. प्रबोधनकारांशी आणि सहकार्‍यांशी दीर्घ विचारविनिमय झाला, आणि संघटनेचे नाव निश्‍चित झाले. १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेना नावाच्या संघटनेचा जन्म झाला, आणि बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र शिवसेनाप्रमुख म्हणून ओळखू लागला. महाराष्ट्र श्रीमंत आहे, पण मराठी माणूस गरीबच आहे, ही स्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेने मराठी माणसाच्या मनामनात जिवंत केली आणि मुंबई व महाराष्ट्रातील मराठी माणूस शिवसेनेच्या मागे उभा राहिला. स्थापनेनंतर चार महिन्यांतच, ऑक्टोबरमध्ये मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या पहिल्याच मेळाव्याला जवळपास पाच लाख लोकांची गर्दी झाली, तेव्हाच शिवसेनेच्या मान्यतेवर शिक्कामोर्तब झाले होते. तेव्हापासून पुढे, महाराष्ट्रात आणि मुंबईत, बाळासाहेब ठाकरे आणि गर्दी हे समीकरण झाले. त्यांच्या सभांना होणार्‍या विक्रमी गर्दीमुळे अन्य राजकीय पक्षांच्या सभा फिक्या ठरत गेल्या.  आज बाळासाहेब आपल्यात नाहीत पण त्यांनी केलेले कार्य मराठी माणसाच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहे.

No comments:

Post a Comment