Thursday 18 June 2020

भारत-चीन सीमा

भारत आणि चीन यांच्यात तीन हजार ४८८ किमी लांबीची सीमा आहे. ही सीमारेषा जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भागातून जाते. ही सीमा पश्‍चिम सेक्टर म्हणजे जम्मू-काश्मीर, मिडल सेक्टर म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि पूर्व सेक्टर म्हणजे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश अशा तीन सेक्टर्समध्ये विभागलेली आहे. अनेक भागांवरून दोन्ही देशांमध्ये वाद असल्याने अजून बर्‍याच ठिकाणी सीमेचे आरेखन झालेले नाही. पश्‍चिम सेक्टरमधल्या अक्साई चीन भागावर भारत आपला दावा सांगतो. हा भाग सध्या चीनच्या नियंत्रणाखाली आहे. १९६२ सालच्या भारत-चीन युद्धादरम्यान चीनने हा संपूर्ण भाग ताब्यात घेतला होता. तर पूर्व सेक्टरमध्ये चीन अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगतो.
चीनच्या म्हणण्यानुसार हा दक्षिण तिबेटचा भाग आहे. तिबेट आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात आलेल्या मॅकमोहन रेषेलाही चीन मानत नाही. १९१४ साली ब्रिटीश भारत आणि तिबेटच्या प्रतिनिधींनी हा करार केला त्यावेळी आपण तिथे उपस्थित नव्हतो, असे चीनचे म्हणणे आहे. तिबेट आमचा भाग असल्याने तिबेट स्वत: एकट्याने कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, असे चीनचे म्हणणे आहे. १९१४मध्ये तिबेट एक दुबळे मात्र स्वतंत्र राष्ट्र होते. मात्र, तिबेट स्वतंत्र राष्ट्र आहे, हे चीनने कधीच मान्य केले नाही. १९५0 साली चीनने तिबेटवर पूर्णपणे ताबा मिळवला. वादांमुळेच दोन्ही देशांमध्ये अजूनही प्रत्यक्ष सीमा आखण्यात आलेल्या नाही. मात्र, आहे ती परिस्थिती कायम ठेवण्यासाठी प्रत्यक्ष सीमारेषा ही संज्ञा वापरली गेली. मात्र, ही सीमारेषा निश्‍चित नाही. दोन्ही देश वेगवेगळ्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा दाखवत असतात. या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अनेक हिमनद्या, बर्फाचे वाळवंट, डोंगर आणि नद्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या अनेक भागातून बर्‍याचदा भारत-चीन जवानांच्या चकमकीच्या बातम्या येत असतात. लडाख सीमेवर भारतीय सैनिकांविषयी भारत-चीन सीमा विवादांचा दृष्टिकोन पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment