Saturday 27 June 2020

जगातील पहिले ए.टी.एम. सुरू झाले इंग्लडमध्ये

लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. २७ जून १९६७ रोजी सुरू झाले. बँकेच्या चार भिंतींबाहेर राहून, ग्राहकास आपल्या खात्यावरील मनी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय एनी टाईम काढून देणारे संगणकीकृत यंत्र म्हणजे एटीएम (अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन). लोक या यंत्राला 'एनी टाईम मनी' यंत्र म्हणतात. ग्राहकाच्या बँक खात्याला हे एटीएम दूरध्वनीच्या तारांनी किंवा अन्य मार्गाने जोडलेले असते. ग्राहकाची ओळख पटविण्याकरिता, एटएम कार्ड देताना बँकेकडून ग्राहकाला एक सांकेतिक गुप्त क्रमांक दिला जातो.
त्याला पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (PIN) म्हणतात. यंत्रात टाकलेले एटीएम कार्ड व संबंधित PIN जुळले तरच एटीएम यंत्र व्यवहार पूर्ण करते. सोपेपणा, व्यवहार्यता, विश्वसनीयता आणि अचूकता या आर्थिक व्यवहारांकरताच्या अत्यावश्यक बाबींची पूर्तता हे यंत्र करते. एटीएम यंत्राद्वारे, बँक ग्राहकास खात्यावरील शिल्लक तपासणे, पैसे काढणे, पैसे भरणे अशा गोष्टी करता येतात. ग्राहक आपला पिन केव्हाही बदलू शकतो. एटीएम यंत्र परदेशांत विविध नावांनी ओळखले जाते. जसे ऑटोमेटेड ट्रँझॅक्शन मशीन, ऑटोमेटेड बँकिंग मशीन, मनी मशीन, बँक मशीन, कॅश मशीन, कॅश पॉइंट, बँकोमॅट इत्यादी. पहिले अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन १९३९ मध्ये न्यूयॉर्क शहरात सिटी बँक ऑफ न्यूयॉर्कने चालू केले. ल्यूथर जॉर्ज सिम्जियन याने ही निर्मिती केली. परंतु, ग्राहकांच्या निराशाजनक प्रतिसादामुळे सहा महिन्यांत ते बंद करावे लागले. यानंतर पुढील २५ वर्षे या क्षेत्रात कांहीच घडले नाही. थेट २७ जून १९६७ रोजी बर्क्लेज बँकेने एन्फील्ड गांवी एक इलेक्ट्रॉनिक अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन उभारले. द ला रू याने या यंत्राची बांधणी केली होती. जॉन शेफर्ड बंरन याची ही मूळ कल्पना होती. याच दरम्यान कांही अन्य अभियंत्यांनीही यासंदर्भात पेटंट्स घेतलेली होती. पीआयएन (PIN)ची कल्पना ब्रिटिश अभियंता जेम्स गुडफेलोची. जॉन शेफर्ड बंरन याला २००५ साली आॅर्डर आॅफ द ब्रिटिश एम्पायरचा सन्मान प्रदान करण्यात आला. धनादेशाचा पाया कोअर बँकिंग यंत्रणेवर उभारलेला आहे. कोअर बँकिंग यंत्रणेत ग्राहकाच्या खात्याची खातेवही आता शाखास्तरावर नव्हे, तर केंद्रीय मुख्यसंगणकावर सांभाळून ठेवलेली असते. एटीएम्स ही त्या त्या बँकेच्या केंद्रीय महासंगणकाशी जोडलेली असतात. परिणामी, या बँकेच्या कोणत्याही शाखेत किंवा एटीएमवर आपल्या खात्याचा तपशील ग्राहकास उपलब्ध असतो. प्रत्येक बँकेला प्रत्येक शहरात एटीएम बसविणे भारतासारख्या खंडप्राय देशात अशक्य आहे. त्यामुळे सहकार्याच्या भावनेतून व व्यावसायिक दृष्टिकोनातून बँकांनी आपापली एटीएम्स एकमेकांस उपलब्ध करून देणे हे क्रमप्राप्त होते. पण त्याकरता प्रत्येक बँकांची नेटवर्क्स एकमेकांशी जोडली जायला हवीत. दोन वा अधिक बँकांचे जाळे जोडणारा दुवा म्हणजे स्विच. याच्या माध्यमातून एका बँकेच्या एटीएममधून दुसऱ्या बँकेतल्या आपल्या खात्यावर व्यवहार करणे शक्य होते. या व्यवहारात खातेदारास एटीएम वापराबद्दल काही शुल्क मोजावे लागते. हे शुल्क स्विच आणि एटीएमबँक ठरावीक प्रमाणात वाटून घेतात.

No comments:

Post a Comment