Friday 12 June 2020

बालकामगार विरोधी दिवस

12 जून जागतिक कामगार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. मुले राष्ट्राची संपत्ती आहेत. उद्याचा भारत बलवान करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. बालकांना शारीरिक, मानसिक स्वास्थ्य मिळणे आवश्यक आहे. त्यांना शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे.  मुलांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. काम करणारी, भीक मागणारी, कौटुंबिक कलहात सापडलेली, तसेच इतर अनाथ मुलांसाठी  समाजात जागृती करताना मुलांना कामावर ठेवू नये, मुलांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवू नये व त्यांच्या विकासाला चालना द्यावी, यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
मुलांना कामावर पाठवणाऱ्या पालकांना आणि त्यांना कामावर ठेवून घेणाऱ्या व्यावसायिकांना कठोर शिक्षा केली जायला हवी.  रस्त्यावर फिरून खेळणी विकणारे, मिठाई विकणारे, ज्वेलरी विकणारी मुले असतात. अशा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी निवासासह शासनाने उचलायला हवी. काही वेळा ही मुले आपल्या कुटुंबातील व्यक्तींना सोबत, तर कधी गावातील ओळखीच्या व्यक्तींसोबत आपला जिल्हा, आपले राज्य सोडून आलेली आढळली आहेत. तसेच काम करणाऱ्या मुलांची संख्या मुलींच्या तुलनेत खूपच जास्त आहे. या मुलांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली असता असे लक्षात येते, की कुटुंबांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, वडील व्यसनाधीन आहेत, कुटुंबातील मुलांची संख्या जास्त आहे. या मुलांना व त्यांच्या कुटुंबांना बालकामगार कायद्याविषयी, मुलांच्या मनावर, शरीरावर होणाऱ्या परिणामांविषयी जागृती नसते. अशी काही मुले वाईट सवयींकडे वळतात. अशी मुले आढळल्यास चाईल्डलाईनवर संपर्क साधावा किंवा पोलिस, बालकल्याण समिती, सहायक कामगार आयुक्त विभाग यांच्याशीसंपर्क साधावा. या मुलांपैकी काहींना आपणही इतर मुलांप्रमाणे शाळेत जावे, सर्वसामान्यांप्रमाणे जगावे, असे वाटते. अशी मुले आढळल्यास योग्य त्या यंत्रणांना माहिती द्यावी व त्या मुलांना त्या परस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदत करावी.

No comments:

Post a Comment