Wednesday 10 June 2020

कामगार नेते नारायण लोखंडे

भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला होता. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालया समोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता. मुंबई सारख्या महानगरामध्ये ज्यांनी कामगारांसाठी मोठी चळवळ उभी करून त्यांच्या हक्कांसाठी पूर्ण जीवन खर्ची केले असे रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे या थोर व्यक्तीची त्यांच्या मुंबई या कर्मभूमीत नाव निशाणी किंवा लक्षवेधी स्मारक सुद्धा नसावे हे कामगार चळवळीला भूषणावह नाही.
आपल्या सारख्या कामगार लोकांसाठी एक दिवस सुट्टी मिळावी म्हणून आपले संपूर्ण जीवन कोणी खर्ची केले हे आपणास माहीत असायलाच पाहिजे. भारतीय कामगार चळवळीचे जनक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि कामगार संघटनेचे भारतातील पाहिले कामगार नेते ज्यांनी साप्ताहिक सुट्टी ही शासकीय सहमतीने अंमलात आणली अशा क्रांतिकारी कामगार नेत्यांची माहिती बहुसंख्य कामगारांना कर्मचार्‍यांना नाही. म्हणूनच भारतात जागतिक कामगार दिन साजरा होतो. पण भारतात ज्यांनी कामगारांना रविवारची सुटी व आठ तासाचे काम, एक तास जेवणाची सुट्टी मिळवण्यासाठी १८८४ ते १८९0 म्हणजे सात वर्षे सनदशीर मार्गाने गिरणी मालक, भांडवलदार व ब्रिटिश सरकारशी संघर्ष केला. त्या नेत्यांचा जय जयकार होत नाही.
नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म १८४८ मध्ये झाला. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण ठाण्यात झाले आणि पुढे उदरनिवार्हासाठी मुंबई येथे भायखळा भागात आले व तिथेच ते राहिले. पण दुर्दैव असे की अशा थोर सत्यशोधकाची माहिती ना त्यांनी स्वत: लिहून ठेवली ना अन्य कोणी लिहिली. पण एक शोधपत्रकारिता करणारे झुंजार पत्रकार मनोहर कदम यांनी भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे हे पुस्तक लिहून आताच्या कामगार नेत्यांचे तोडपाणीचे धंदे उघड पाडले. स्वत:च्या चांगल्या नोकरीला लाथ मारून आपले सर्व कुटुंब उपासमारीने होरपळणार आहे हे स्पष्ट दिसत असताना, देशातील लक्षावधी स्त्री-पुरुष कामगारांचे संसार फुलवण्याचे व्रत हयातभर नारायण लोखंडे यांनी स्वीकारले. आणि एकच वेळी गिरणी मालकांच्या दृष्टीने स्वामीद्रोह आणि ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने राजद्रोह स्वीकारला. त्यामुळे केव्हाही काहीही घडण्याची शक्यता असताना नारायण मेघाजी लोखंडे यांनी सत्यशोधक समाजाच्या कावड झेंड्याखाली कामगारांना एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि महात्मा जोतिबा फुले यांची प्रेरणा घेऊन त्यांनी मुंबईमध्ये बॉम्बे मिलहॅन्डस असोसिएशन ही भारतातील पहिली कामगारांची संघटना स्थापन केली.
आजही नाका कामगार, घरकामगार, कचरा वेचक कामगार यांच्या बाबत मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व करणार्‍या पक्ष, संघटना संस्थेचे कार्यकर्ते नेते चांगले बोलत नाही. सुधारणार नाहीत हे बेवडे, दारुडे आहेत. त्यांची संघटना बांधणे मूर्खपणा आहे.असे म्हणणारे लोक आहेत. मग नारायण लोखंडे यांनी कोणत्या परिस्थितीत काम केले असेल यांची कल्पना करा. १८७५ मध्ये भारतातील काही महत्त्वपूर्ण शहरांमध्ये एकूण ५४ गिरण्या चालू होत्या. मुंबईमध्ये हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला होता आणि त्याच बरोबर कामगारवर्ग सुद्धा वाढत चालला होता. दिनबंधूच्या १८९५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंकात नारायण लोखंडे यांनी गिरण्यात काम करणार्‍या स्त्रिया आणि बालकामगार यांची संख्या देऊन त्यांच्याकडून किती काम करून घेतले जाते याची तपशीलवार माहिती प्रसिद्ध केली होती. शेवटी १0 जून १८९0 रोजी रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला. हा कामगारांच्या एकजुटीचा व नारायण मेघाजी लोखंडे यांचा कुशल नेतृत्वाचा मोठा विजय होता. म्हणूनच भारतातील कामगारांचा पहिला कामगार दिन हा १0 जून १८९0 हाच खरा कामगार दिन आहे.

No comments:

Post a Comment