Monday 22 June 2020

●●जागर-जागरण●●


व्यक्तिविशेष

मृणाल गोरे
मृणाल गोरे यांचा जन्म २४ जून, इ.स. १९२८; खेडमध्ये झाला. या भारतातील समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले. या महाराष्ट्र विधानसभेत आमदार होत्या. तसेच सहाव्या लोकसभेत या खासदार होत्या.
मृणाल गोरे यांनी राष्ट्र सेवा दल संघटनेच्या माध्यमातून तरुणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. इ.स. १९७२ मध्ये मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या. मुंबईच्या गोरेगाव उपनगरात त्या पाणीवाल्याबाई म्हणून प्रसिद्ध होत्या.
पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी ५ डिसेंबर १९५८ रोजी केशव गोरे स्मारक ट्रस्ट स्थापन केला. गोरेगावातील आरे रोडला या ट्रस्टची भव्य इमारत आहे.यांच्या नेत्रत्वाखाली मुंबईत लाटणे मोर्चा निघाला होता. लाटणे मोर्चा-जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणार्‍या स्त्रीयांनी १९७२ मध्ये महाराष्ट्रात आपली संघटीत ताकद दाखवून दिली.समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला.
ऐन दिवाळीत तेल,तूप,साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या रॉकेल महाग झाले होते.त्यामुळे मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले.या आंदोलनाला यश मिळाले आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा अविष्कार जनतेला समजला. १७ जुलै, इ.स. २0१२ रोजी वसई येथे हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.



सुविचार
स्वतःसाठीच जगलास तर मेलास; इतरांसाठी मेलास तर जगलास.-आचार्य प्र. के. अत्रे

संशोधन
कोरोना आणि लस
जगभरात कोरोनावर 135 हून अधिक लसींवर संशोधक काम करत आहेत. होल व्हायरस व्हॅक्सीन, जेनेटिक व्हॅक्सीन, व्हायरल व्हेकटर व्हॅक्सीन, प्रोटीन बेस्ड  व्हॅक्सीन असे त्याचे प्रकार आहेत. लस तयार करण्यासाठी किमान सात ठळक टप्पे असतात. त्यामुळे लस तयार होण्यासाठी लागणारा कालावधी हा किमान वर्षभराचा असतो. परंतु सध्याच्या आव्हानात्मक काळात जगभरातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस एक करून लस तयार करण्यासाठी अक्षरशः युद्धपातळीवर काम करीत आहेत. याचबरोबर औषधांवरही मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून या प्रवासातील एक उल्लेखनीय टप्पा म्हणून भारतातील 'ग्लेनमार्क' या कंपनीने तयार केलेल्या 'फ़ॅबिफ्लू' या औषधाचा उल्लेख करता येईल. तसेच जगभरात उपयोगी पडत असलेल्या 'रेडमेसिविर' या औषधाचे भारतात उत्पादन करण्याची परवानगी 'हेटेरो' आणि 'सिप्ला' या दोन कंपन्यांना मिळाली आहे. अर्थात औषध बाजारात आले असले तरी धोका टळला, असे मानता येणार नाही. सध्या लस काही उपलब्ध
नाही, त्यामुळे या संकटाला सामोरे जाणे एवढेच आपल्या हातात आहे. या सगळ्या परिस्थितीचे वर्णन व अंदाज 'इंडियन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ'च्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांसाठी दोन औषधे उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. ग्लेनमार्कच्या सिन्नर येथील प्रयोगशाळेत 'फॅबिफ्लू'चे संशोधन झाले व हिमाचल
प्रदेशातील प्रकल्पात त्याचे उत्पादन घेण्यात येणार आहे. जपानमधील फुजिफिल्म टोयामा केमिकल्सने 'एन्फ्लूएंझा'वर 'फेव्हीपिराविर' हे औषध तयार केले होते. त्यातील मूळ घटकांचा वापर करून कोरोनावरील औषध तयार केले गेले. कोरोनाची मध्यम लक्षणे असणारे रुग्ण या औषधामुळे बरे झाल्याचा कंपनीचा दावा आहे. 'फेव्हीपिराविर' औषधाचा उपयोग यापूर्वी रशिया, जपान आणि चीनमध्ये करण्यात आला
आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्या कोरोना रुग्णांनाही याचा उपयोग होणार आहे. या औषधाच्या कार्यपद्धतीमुळे ते विषाणूच्या प्रतिकृती निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावण्यास मदत करते. सध्या भारतामध्ये कोरोनावरील उपचारांत रेमडिसिविर' आणि 'टोसिलिझुमाब' या औषधांचा वापर केला जातो. ही तिन्ही औषधे 'अँटव्हायरल' आहेत. औषधांचा उपयोग ढोबळ मानाने दोन पद्धतींनी केला जातो. एक म्हणजे रोग होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक (म्हणजे
लस) आणि दुसरा म्हणजे रोग झाल्यानंतर त्यातून बरे
होण्यासाठी. 'फॅबिफ्लू' हे दुसऱ्या प्रकारातील औषध आहे. डेक्सामिथेसोन, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, ओवायए 1' अशी इतर औषधेही जगभरात वापरली जात आहेत. परंतु, या सर्व औषधांची उपयुक्तता पूर्णपणे सिद्ध झालेली नाही, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.

सिनेमा
कपूर घराण्यातली श्रद्धा
श्रद्धा कपूर ही प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर यांची कन्या. अप्सरेला लाजवेल असं काही तिचं सौंदर्य नाही. शिवाय तिच्याकडे असामान्य अभिनय क्षमता असल्याचा अजून साक्षात्कार झालेला नाही. तिच्या नावावर अजूनही एकसुद्धा 'सोलो हिट' ची नोंद नाही. असं असलं तरी तिच्या मोठ्या बॅनरमध्ये वावर आहे. हीच तिची जमेची बाजू. शिवाय जाहिरातींमध्येही ती सतत झळकत असते. या हिंदी सिनेमा सृष्टीत येऊन तिला दहा वर्षे झाली आहेत.
गोड दिसणारी आणि हसणारी श्रद्धा आपल्याला कुठेच पुढे पुढे  आढळून येत नाही. आता कित्येक मुली अभिनयात शून्य असल्या तरी वादविवाद, अफेअर्स गॉसिप, पार्ट्यातल्या भानगडी,त्यांच्या मग्रूरीच्या, हेकेखोरपणाच्या बातम्या किंवा बेताल फॅशन अशा माध्यमातून सतत चर्चेत असतात, मात्र श्रद्धा या सगळ्याला अपवाद आहे. असं वाटतं की, चित्रपट सृष्टीत किंवा प्रेक्षकांच्या मनात टोकाची नकारात्मक प्रतिमा असणाऱ्या वडिलांकडे बघून लहानाची मोठी झालेल्या श्रद्धाने आयुष्यात वाटचाल कशी करायची, हे शिकली असावी. ही श्रद्धा मराठमोळी आहे. तिचे आजोबा म्हणजे सुप्रसिद्ध गायक-वादक पंढरीनाथ कोल्हापुरे. आई शिवांगी कोल्हापुरे. आईने एकाद-दुसऱ्या चित्रपटात काम केलं असलं तरी उठावदार अशी काही तिची कामगिरी नाही. मात्र प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे ही तिची मावशी. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची श्रद्धा ही भाचे-नात. साहजिकच तिचे अनेकांशी मराठीतूनच संवाद असतात.
श्रद्धा शास्त्रीय संगीत आणि कथ्थक शिकली आहे. तिला लिहिण्याचा आणि पेंटिंगचा छंद आहे. 'गलियां 'तेरी गलियां' (एक व्हिलन) या गाण्याच्या माध्यमातून तिने आपल्या संगीत कारकिर्दीचा श्रीगणेशा केला आहे. यानंतर तिने 'दो जहां..'(हैदर), 'बेजुबां फिर से..' (एबीसीडी 2), 'सब तेरा.. (बागी), 'फिर भी तुम को .. (हाफ गर्लफ्रेंड) अशी गाणी तिने गायली आहेत. 'रॉक ऑन2' साठी तिनं जॅझ आणि रॉक संगीताचं प्रशिक्षणही घेतलं.
'तीन पत्ती' हा तिचा पहिला चित्रपट.  'स्त्री', ' बागी', 'हैदर', 'एक व्हिलन' ,'साहो' आणि 'छिछोरे' 'आशिकी 2' ,'रॉक ऑन 2', यात तिने लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या आहेत. दरम्यान 'ओके जानू', 'हसीना पारकर', बत्ती गुल मीटर चालू' असे फ्लॉप चित्रपटही तिने दिले.
वरुण धवनसोबतचा 'स्ट्रीट डान्सर' हा चित्रपट म्हणजे 'एबीसीडी 2' चा सिक्वेल आहे. 'आशिकी 2' हा तिचा सर्वात गाजलेला चित्रपट.

अजब-गजब
बाप-लेकाने खोदली विहीर
देशातील कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान, वडील व मुलाने विहीर खोदून आपल्या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. जेव्हा लोक लॉकडाऊनमध्ये वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेते होते, तेव्हा दोघांनीही आवश्यक असलेल्या समस्या दूर करण्याचा निर्णय घेतला आणि विहीर खोदण्यास सुरुवात केली.
या दोघांच्या प्रयत्नांना निसर्गानेही पाठिंबा दिला. आणि या दोघांनाही जवळपास १६ फूट खोलीत पाणी शोधण्यात यश आले. हे कुटुंब नांदेड जिल्ह्यातील मुळजारा गावात राहते आणि आता कायम पाणी उपलब्ध असल्याचा त्यांना आनंद आहे. सिद्धार्थ देवके  हे ऑटो चालक म्हणून काम करीत होते. ते बंद पडल्याने त्यांचे काम थांबले. याशिवाय ते स्थानिक बँडमध्येही काम करायचे, पण बंदमुळे हे कामही थांबले. आणि त्याचे उत्पन्नाचे स्त्रोत हरवले. उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नव्हते आणि पाण्याची समस्याही त्याच्यासमोर उभी राहिली. रोजच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागले. यावेळी त्याने घराच्या आवारात एक विहीर खोदण्याची कल्पना आली.  ते आणि त्यांचा मुलगा घरीच बसून होते. म्हणून पाण्याची समस्या दूर करण्यासाठी विहीर खोदण्याचे त्यांनी ठरविले. देवके जमीन खोदत असत आणि त्याचा मुलगा पंकज खड्ड्यातून माती काढण्याच्या काम करीत असे.अशाप्रकारे १६ फूट विहीर खोदली आणि आता त्यांच्याकडे पाणी आहे.

संस्कृती
दिवा लावण्याचे महत्त्व
दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचेही प्रतीक मानले जाते. दररोजच्या देवपूजनात दिव्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले
आहे. घरात दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते. घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. धर्मशास्त्रानुसार, देवासमोर दिवा लावणे अनिवार्य मानले गेले आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो. पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे, स्थिर राहण्याचे आवाहन अग्नी देवतेला केले जाते. यानंतर पूजा झाल्यानंतरही देवासमोर दिवा लावला जातो. आपल्याकडे तेलाचा आणि तुपाचा दिवा देवासमोर लावला जातो. कोणताही दिवा लावला तरी चालतो. मात्र, तुपाच्या दिव्याने अधिक सकारात्मकता येते असे सांगितले जाते. देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते, अशी मान्यता आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते.
अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो; त्यावेळी वातावरण पवित्र होते. प्रदूषण दूर होते. दिवा लावल्याने संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो. कोणत्या दिशेला लावावा? दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत. आपण जर तेलाचा दिवा लावत असाल तर, तो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवावा आणि जर तुपाचा दिवा लावणार असाल, तर आपल्या उजव्या हाताला असायला हवा, असे सांगितले जाते. धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी.
आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात आल्या आहेत. पश्चिम दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दक्षिण यमाची दिशा असल्याने दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी, असे सांगितले जाते.
संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment