Tuesday 9 June 2020

धुव्वाधार फलंदाज:अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे हा त्याच्या नावाप्रमाणेच धुव्वाधार फलंदाजीसाठीही ओळखला जातो. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि द वॉल म्हणून परिचित असलेल्या राहुल द्रविडला तो आदर्श मानतो. एवढेच नाही तर, माजी क्रिकेटर व्ही.व्ही.एस. लक्ष्मणप्रमाणेच तो कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो. त्यामुळे त्याची तुलना व्ही.व्ही.एस. लक्ष्मणबरोबर केली जाते. त्याचा जन्म ६ जून १९८८ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अश्चि-केडी येथे. अजिंक्यचा अर्थ, ज्याला कुणीही हरवू शकत नाही, जो अभेद्य आहे, असा होतो.  अजिंक्य रहाणेला त्याचे मित्र-मंडळी जिंक्स असे संबोधतात.

वयाच्या सातव्या वर्षीच अजिंक्यचे क्रिकेट ट्रेनिंग सुरू झाले होते. अजिंक्यचे वडील त्याला मुंबईच्या डोंबिवली येथील एका छोटेखानी क्रिकेट क्लबमध्ये घेऊन जात. तेथे मॅटवर क्रिकेट कसे खेळावे याचे प्रशिक्षण अजिंक्यला मिळाले. १७ वर्षांचा झाल्यानंतर राहाणेने भारतीय फलंदाज प्रवीण आमरे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. २०११ मध्ये झालेल्या इराणी ट्रॉफीमध्ये राहाणेने १५२ धावा फटकावल्या होत्या. त्याच्या या कामगीरीबद्दलच त्याला भारतीय कसोटी संघात संधी मिळाली होती.
अजिंक्य रहाणे क्रिकेटशिवाय कराटे चॅम्पियन असून त्याच्याकडे ब्लॅक बेल्टदेखील आहे. अजिंक्य आध्यात्मिक वृत्तीचा देखील आहे. तो मनः शांतीसाठी रोज ध्यान करतो, त्याची शिर्डीच्या साईबाबांवर अपार श्रद्धा आहे. अजिंक्य रहाणेला २०१२ पर्यंत म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये सामील होण्याआधीपर्यंत टी-२० साठी अपात्र समजण्यात येत होते. मात्र राजस्थान रॉयल्सकडून खेळताना तडाखेबंद फलंदाजी करून त्याने हा समज खोटा ठरवला. नोव्हेंबर २०१९ च्या आयसीसी प्लेयर रँकिंगनुसार पर्यंत रहाणे
जगातील ७ व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्यांनी आपले पहिले कसोटी शतक न्यूझीलंडविरुद्ध बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन येथे झळकवले होते. ऑगस्ट २०१९ रोजी वेस्ट इंडिजविरूद्ध १० व्या शतकी खेळीची खेळी करत भारताला ३१८ धावांनी विजय मिळवून दिला. शतक आणि अर्धशतकांसह १८४ धावा करून रहाणेला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. २०१५ मध्ये श्री लंकेत पहिली टेस्ट खेळताना आठ कॅच पकडून त्याने विश्च विक्रम प्रस्थापित केला होता.
रहाणेने या सामन्याच्या पहिल्या डावात करुणारत्ने, थिरिमाने, चांडीमल यांना झेलबाद केले. व दुस-या डावात प्रसाद, संगकारा, थिरिमाने, मुबारक आणि हेराथ यांनाही त्यांने झेलबाद करून तंबूत धाडले होते. नोव्हेंबर २०१९ रोजी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रहाणेने ८६ चेंडूंत १७२ धावा फटकावत ९ वेळा चौकार मारला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे २१ वे कसोटी अर्धशतक ठरले. अजिंक्य रहाणेने २०१४ मध्ये आपल्या बालपणातील मैत्रिणी राधिका धोपवकरशी लग्न केले. १९ व्या सीएट क्रिकेट पुरस्कारासाठी सीएट सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. मे २०१६ मध्ये रहाणेची अर्जुन आवार्ड साठी शिफारस केली. २०१८ मध्ये त्याला क्रिकेटमध्ये उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे.

No comments:

Post a Comment