Friday 5 June 2020

प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चटर्जी

चित्रपट केवळ करमणुकीसाठी नसतात असे मानणार्‍यांपैकी बासु चटर्जी यांचे नुकतेच निधन झाले. हिंदीच नव्हे, तर भारतीय चित्रसृष्टीला वेगळे वळण देणार्‍या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये बासु चटर्जी यांचा समावेश होतो. नर्म विनोद ही त्यांची खासियत होती तरीही त्यांचे चित्रपट मानवी स्वभावावर सुरेख भाष्य करत असत.  रंजन करणार्‍या चित्रपटांतूनही त्यांनी माणसाच्या मनाचा, नातेसंबंधांचा शोध घेतला. स्वतंत्र शैलीमुळे ते एक महत्त्वाचे चित्र कलावंत ठरले.
 हिंदी आणि बंगाली चित्रपट, दूरचित्रवाणी अशा भिन्न माध्यमांमध्ये त्यांनी सहज संचार केला आणि आपला ठसा उमटवला.
बासु चटर्जी थेट चित्रपट क्षेत्रात प्रवेशले नव्हते. मुंबईत एका इंग्रजी साप्ताहिकात ते व्यंग्य चित्रकार होते. माणसाच्या स्वभावातील वैशिष्ट्ये टिपण्यास त्यांनी तेथे सुरुवात केली असावी. राज कपूर अभिनित ’तीसरी कसम’ द्वारे त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला, ते देखील सहायक दिग्दर्शक या नात्याने. त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ’सारा आकाश’. तो गंभीर होता. मने न जुळलेल्या दोन व्यक्ती विवाह बंधनात अडकल्यावर होणार्‍या परिणामांचे दर्शन त्यातून घडते. बासु चटर्जी यांना देशभर प्रसिद्धी मिळाली ती ’रजनीगंधा’ प्रदर्शित झाल्यावर. एका कार्यालयात एकत्र काम करणार्‍या दोन कारकुनांची प्रेमकहाणी प्रेक्षकांना भावली. शहरी मध्यमवर्गाचे जीवन चित्रपटाचा विषय ठरू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यानंतरच्या ’छोटीसी बात’, ’प्रियतमा’, ’बातों बातों में’ या व अन्य चित्रपटांनी मध्यमवर्ग केंद्रस्थानी आणला. ते करताना त्यांनी चित्रपटांची एक वेगळी शैली आणली.
व्यावसायिक हिंदी चित्रपट जेव्हा एकतर रडक्या कौटुंबिक कथा किंवा गुन्हेगारी, सूड अशा तकलादू कथावस्तूंत अडकले होते तेव्हा बासुदा चित्रसृष्टीत प्रवेशले. सामान्य माणसांची छोटी स्वप्ने, साध्या आकांक्षा यांना त्यांनी चित्ररूप दिले. नायक रूप-गुण संपन्न, बलशाली हवा या कल्पनेला बासुदांनी छेद दिला. मारामारी, उत्तानता नसूनही चित्रपट यशस्वी होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केले. ’खट्टा मीठा’ मध्ये पारशी, ’बातों बातों में’मध्ये ख्रिश्चन पार्श्वभूमी त्यांनी वापरली, त्यातून ते संस्कृतीचे बारकावे टिपत होते. नेहमीच्या नात्यांमधली वीण आणि त्यांचे पदर ते उलगडत असत. त्यांच्या चित्रपटांत स्त्रीला महत्त्वाचे स्थान असते. स्त्रीच्या मनाच्या थांग घेण्याचा त्यांचा यत्न असे. तिच्या भावनांचा ते वेध घेत; पण सूचक पद्धतीने. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ’पिया का घर’. मुंबईतील घरांची वानवा आणि छोट्या घरात राहताना नवविवाहितेची होणारी तगमग त्यांनी मांडली. बासुदांचा चित्रपट साचेबद्ध नव्हता. त्यांचे चित्रपट मध्यमवर्गाशी संबंधित होते, हे खूप सैल विधान ठरेल. ग्रामीण भागही त्यांच्या चित्रपटात आला; पण तोही मानवी नातेसंबंधांची पार्श्वभूमी बनून. माणसांमधील संबंध ते सतत तपासत राहिले. बासुदांनी अनेक बड्या तारेतारकांबरोबरही काम केले. ’मन पसंद’ मध्ये देव आनंद व टीना मुनीम होते. ’पिग्मॅलियन’ वर आधारित हा चित्रपट उच्चशिक्षित व अशिक्षित यांच्यातील उमलते, अवघड नाते उलगडतो. ’ट्वेल्व अँग्री मेन’ वर आधारित’एक रुका हुआ फैसला’मध्ये अंतर्मनातील कलह त्यांनी दाखवलेे. विवाह उंबरठ्यावर आला असताना आत्महत्या करणार्‍या तरुणीची कथा ’कमला की मौत’मधून मांडताना स्त्रीच्या मनातील क्लेशांना चित्ररूप दिले. पुनर्जन्म ही कल्पनाही त्यांनी ‘तुम्हारे लिये’ मध्ये वापरली. संजीवकुमार, धर्मेंद्र, हेमा मालिनी, राजेश खन्ना अशा नामवंतांना घेऊन त्यांनी चित्रपट केले ते व्यावसायिक-दृष्ट्या यशस्वी झाले नाहीत. त्यांच्या बर्‍याच चित्रपटांना शहरी भागात जास्त यश मिळाले,हे त्यांचे अपयश नव्हे. कलात्मक मूल्ये जपताना चित्रपटाच्या आर्थिक यशाचाही त्यांनी विचार केला. त्यामुळे ’मध्यममार्गी ’ प्रवाहातील ते एक यशस्वी दिग्दर्शक ठरले. ’रजनी’ या दूरदर्शन मालिकेने त्या काळात अमाप लोकप्रियता मिळवली. महिलांना लढाऊ वृत्ती त्या मलिकेने दिली. ’ब्योमकेश बक्षी’ मालिकेतून बासुदा यांनी रहस्य उलगडणारा गुप्तहेर सादर केला. त्यांच्या चित्रपटांत गाणी कथानकाचा भाग असत. सलील चौधरी, एस.डी व आर.डी बर्मनसारख्या संगीत दिग्दर्शकांच्या स्वर रचनांमुळे ती गाणी स्मरणीय ठरली. अलीकडच्या काळापर्यंत बासुदा बंगाली चित्रसृष्टीत काम करत होते. प्रेक्षकांचे रंजन करतानाच माणसाच्या मनाचा शोध घेणारा, उच्च अभिरुचीचे चित्रपट देणारा एक दिग्दर्शक देशाने गमावला आहे.

No comments:

Post a Comment