Friday 5 June 2020

पर्यावरण सुदृढ आणि निरोगी ठेवू

निसर्ग व पर्यावरण यांच्यातीलनाते संबंधांचा मागोवा घेण्यासाठी आणि या नातेसंबंधांतील निसटलेले दुवे शोधून ते पुन्हा जोडता येतील का याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने जगाच्या इतिहासात पहिल्यांदा १९७२ मध्ये जून महिन्यात स्वीडनमधील स्टॉकहोम येथे जागतिक परिषद आयोजित करण्यात आली.५ जून ते १६ जून असे ११ दिवस चाललेल्या या परिषदेत ११२ देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते. भारतातर्फे तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा या परिषदेत सक्रिय, उल्लेखनीय सहभाग होता. या परिषदेचे सकारात्मक परिणाम लवकरच दृष्य स्वरूपात जाणवू लागले. या ऐतिहासिक परिषदेनंतर जागतिक पातळीवर निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण तसेच संवर्धन करण्याच्या हेतूने भारतासारख्या राष्ट्रांनी अनेक महत्वाचे कायदे केले.
या परिषदेत पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाच्या हेतूने अनेक महत्वाचे ठराव आणि करार करण्यात आले. त्याचप्रमाणे या पहिल्या ऐतिहासिक परिषदेची सुरुवात ज्या दिवशी झाली त्या दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे या परिषदेच्या समारोपाच्या दिवशी ठरले. यावर्षी जागतिक पातळीवर 'कोरोना' या विषाणूंच्या गटातला एक कोरोना व्हायरस -१९ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विषाणूने मानवी समूहांमध्ये संक्रमित होऊन खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी करत आहे. आणि अजूनही त्याचा संक्रमित होण्याला काही आळा बसताना दिसत नाहीये. या पार्श्वभूमीवर या वर्षाचा पर्यावरण दिन साजरा होतो आहे. किंवा 'पाळण्यात' येतो आहे असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. या निमित्ताने थोडं अंतर्मुख होऊन विचार करायला वेळ
मिळतो आहे. आजच्या पर्यावरण दिनाची संकल्पना जैवविविधतेवर आधारलेली आहे. कोविड १९ या विषाणूचा उगम आणि जगभर फैलाव कसा झाला यावर संशोधन सुरू झालं आहे आणि अनेक सिद्धांत मांडले जात आहेत. या सर्व घडामोडींमधून एक महत्वाची बाब समोर येत आहे तो म्हणजे अशा प्रकारे साथीच्या रोगाचा जागतिक पातळीवर फैलाव होण्यास जैवविविधतेचा सातत्याने होत असलेला हास मुख्यत्वे कारणीभूत आहे. याचं कारण असं की सर्व प्रकारचे जीवाणू व विषाणू हे नैसर्गिक अधिवासांमध्ये असलेल्या वन्यप्राण्यांच्या शरीरात असतात. हे वन्यप्राणी अशा रोग जंतूंचे वाहक ठरू शकतात. वास्तविक पाहता उपसे वाहक आणि माणूस एकमेकांच्या थेट संपर्कात येणं अतिशय दुर्मिळच. पण गेल्या काही दशकांमध्ये भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये विकासात्मक प्रकल्पांसाठी या वन्यप्राण्यांचे अधिवास नष्ट केले जात आहेत. त्याचबरोबर खवल्या मांजरांसारख्या प्राण्यांची मानवी हस्तकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. या व अशा अनेक मागांनी वन्य प्राणी आणि मानव यांचा थेट संपर्क येण्याच प्रमाण वाढीस लागलं आहे आणि अशा प्रकारच्या साथीच्या घटना भविष्यातदेखील वारंवार घडतील असं प्रतिपादन करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या विषाणूंच्या वाढीला, फैलावाला दुसरा एक घटक कारणीभूत आ हे तो म्हणजे पृथ्वीचं वाढत चाललेलं सरासरी तापमान आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेली जलवायू परिवर्तनाची (क्लायमेट चेंज) समस्या. इंटरगव्हन्र्मेण्टलपॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या पर्यावरण आणि हवामान शास्त्रज्ञांच्या संस्थेने अनेक वर्षांपूर्वी हे भाकीत केलं आहे की भविष्यात अशा प्रकारच्या साथीच्या रोगांची वारंवारता वाढत जाणार आहे. कारण नैसर्गिक अधिवासांचा ऱ्हास , तापमानवाढ आणि जलवायू परिवर्तन हे घटक अशा प्रकारच्या जीवाणूविषाणूंच्या अस्तित्वाला पोषक ठरू शकतात. तापमानवाढ आणि जलवायू परिवर्तन होण्यास कारणीभूत असलेले हवेतील कार्बन डाय ऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड यासारख्या प्रदुषकांचं प्रमाण ठरविक पातळीवरच मर्यादित राहिल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या राज्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या संदर्भात अतिशय प्रभावी उपाययोजना राबवत आहे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृतीदेखील करत आहे. आजच्या या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एकंदरीतच जैवविविधतेचा, वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासांचा होत असलेला ऱ्हास थांबवणे तसेच नैसर्गिक संसाधनाचा जपून वापर करणे आणि पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहणे यासाठी आपण कंबर कसू या. आपलं निसर्ग, आपलं पर्यावरण जेवढं सुदृढ आणि निरोगी राहिल, तेवढं आपणदेखील सुदृढ व निरोगी राहू आणि मग कोणत्याही औषधोपचाराशिवाय
कोरोनासारख्या विषाणूंचा नायनाट करण्याची आपली शारीरिक क्षमता अधिक सबळ होईल यात शंकाच नाही!

No comments:

Post a Comment