Monday 22 June 2020

विश्व संचार


व्यक्तिमत्त्व

पहिली महिला फायटर पायलट
देश सर्वोपरी हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून तिने स्वत:च्या आयुष्यापेक्षा देशसेवेला महत्त्व दिले आणि देशातील दहावी व राज्यातील पहिली महिला फायटर पायलट होण्याचा बहुमान मिळविला. ही गोष्ट आहे फ्लाईंग ऑफिसर अंतरा रवी मेहता यांची. भौतिक सुखसोयींचा त्याग करीत तिने आव्हानात्मक कार्याला प्राधान्य दिले, तिच्यारूपाने राज्याला पहिली महिला फायटर पायलट मिळाली. अंतरा रवी मेहता या मूळ नागपुरातील आहेत.
सैन्याबद्दल अंतराच्या मनात नेहमीच आदरभाव राहिला आहे. वैभवाने आकाशाला स्पर्श करू, असे स्वप्न तिने पाहिले आणि ते पूर्णत्वासही नेले. माऊंट कार्मेल गर्ल्स स्कूल येथून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करून तिने रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान अंतरापुढे गलेलठ्ठ पगार असणार्‍या खाजगी नोकरीची संधी चालून आली. पण तिने ती नाकारली. देशाच्या रक्षणासाठी वायुसेनेत जायचे हे ध्येय निश्‍चित होते. कुटुंबातील सदस्यांनी तिला प्रोत्साहित केले. अंतराने हैद्राबाद येथील डुंडीगल येथील वायुसेना अकादमीत प्रवेश मिळविला. जवळपास वर्षभर प्रशिक्षण घेतल्यावर अंतरा यांनी पिलेटस पीसी-७ हे विमान यशस्वीरीत्या उडविले. दुसर्‍या टप्प्यात तिने किरण एमके-१ हे लढाऊ विमान उडविले. तर नुकतेच झालेल्या पासिंग आऊंट परेडमध्ये १२३ प्रशिक्षणार्त्यांसह आपले प्रशिक्षण पूर्ण करून अंतरा या फ्लाईंग ऑफिसर झाल्या. आता त्यांना कर्नाटक येथील बिदर आणि प. बंगाल येथील कलाईकोंडा येथे फायटर प्लेनचे प्रशिक्षण घेत आहेत.

सुविचार
सर्व गोष्टींच्या बाबतीत नेहमीच निराशेपेक्षा आशा बाळगणे चांगलेच असते.-अज्ञात

बोधकथा
हुशार पिल्लू
एकदा एक करडू मोठया बोकडाबरोबर रानात चरत
होते. एक लांडगा तिथून जात होता. लांडग्याने त्या
करडाला पाहिले. त्याला पाहून त्या लांडग्याच्या
तोंडाला पाणी सुटलं. पण बरोबरच्या मस्तवाल
बोकडाच्या भीतीने लांडगा काही करू शकत नव्हता. म्हणून लांडगा त्या करडाला म्हणाला, 'तू असा आईला सोडून या रानात कसा आलास! इथे तुला काय मिळणार? घरी आईचे दूध मिळेल, चल मी गावात चाललोय, तुलाही सोडतो आईकडे.'
छोटेसे किरडू विचारात पडले. त्याला या लांडग्याची चाल उमगली होती. त्यामुळे संभाव्य धोकाही लक्षात आला. या लांडग्याला टाळण्याच्या उद्देशाने त्याने काय करायचे हे ठरविले आणि म्हणाले, अरे, मी आलो असतो पण असा कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? तुझी आणि माझी ओळखसुद्धा नाही. आईनेच मला या ओळखीच्या बोकडाबरोबर रानात पाठवलय. त्याच्याबरोबर मी घरी जाईन. तू काळजी करू नकोस. हुशार पिल्लाचे बोलणे ऐकून लांडगा खजील झाला आणि काहीही करता येत नसल्यामुळे चरफडत तिथून निघून गेला. करडू मात्र मजेत चरत राहिले.
तात्पर्य- चतुराईने कुटील डावांवर सहज मात करता येते.

गॅझेटस
नोकियाचा क्लासिक फोन
नोकियाचा नवीन फोन येत आहे. हा Nokia 5310
आहे. नोकियाचा हा फोन 16 जून रोजी भारतात लाँच
होणार आहे. नोकिया मोबाईल इंडियाच्या ट्विटवरून
ही माहिती उघड झाली आहे. हा फोन अवघ्या चार
दिवसांत लाँच करण्यात येणार आहे. याआधी खुलासा
झाला आहे की, नोकिया 5310 या महिन्याच्या 16
जूनला येणार आहे. नोकियाने या फोनला मार्चमध्ये
समोर आणला होता. हा फोन 2007 मध्ये लाँच
झालेल्या क्लासिक नोकिया 5310 एक्सप्रेस म्यूझिकचे
अपडेट व्हर्जन आहे. नवीन नोकिया 5310 फोन खास
मल्टीकलर डिझाईनमध्ये येत आहे. फोनच्या साईडला
फिजिकल प्लेबॅक कंट्रोल्स दिले आहेत. नोकिया
मोबाईल्स इंडिया ने आपल्या ट्विटर हँडलवरून एक
टीझर रिलीज केला आहे. 10 सेकंदांच्या या टीझर
व्हीडिओमध्ये Nokia 5310 चा लूक अनेकदा
पाहायला मिळतो.

फेरफटका
लहान देशांना ग्लोबल वॉर्मिंगचा फटका
सध्या संपूर्ण जगालाच तापमान वाढीच्या समस्येला
सामोरे जावे लागले आहे. भारतासह अनेक देशांना
सध्या उन्हाने त्रस्त करून सोडले आहे. अशाचप्रकारे
जगातील चौथ्या क्रमांकाचा लहानसा देश 'तुवालू'सुद्धा सूर्याच्या प्रकोपाने त्रस्त झाला आहे. पॅसिफिक महासागरातील ऑस्ट्रेलिया आणि हवाई या देशांच्या मध्ये 'तुलाई' हा लहान लहान बेटांचा देश आहे. निसर्गसौंदर्याने संपन्न असलेला हा देश सध्या जागतिक तापमान वाढीचा बळी ठरत आहे. येथील तापमान इतके वाढले आहे की, तेथील लोकांची त्वचा अक्षरशः होरपळू लागली आहे. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे अशा त्वचेवर औषध म्हणून लावण्यात येणारी 'सनक्रिन' तेथे मिळत नाही. सनक्रिन हवी असल्यास तब्बल दीड तासांचा विमान प्रवास करून फिजीला जावे लागते.

फुल्ल फार्म
POTA : प्रिवेंशन ऑफ टेररिस्ट अॅक्टिव्हिटी
UNCTAD : युनायटेड नेशन्स कॉन्फ्रेन्स ऑन ट्रेड अॅण्ड डेव्हलपमेंट

वस्तुस्थिती
महाराष्ट्रातील जंगल
देशाचा योग्य आणि संतुलित विकास करण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के इतकी जमीन जंगलाखाली असायला हवी. मात्र महाराष्ट्रात आजमितीला फक्त 20.13 टक्के इतकेच जंगल शिल्लक राहिले आहे. विशेष म्हणजे हे 20.13 टक्के जंगल ज्या जिल्ह्यांच्या आधारावर आहे, तिथे मानव आणि वाघांचा संघर्ष अधिक आहे. गेल्या चार वर्षांत 65 माणसे आणि 100 वाघ या संघर्षात बळी पडले आहेत. यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांमध्ये जंगल क्षेत्र अधिक आहे. याच परिसरात वाघांची संख्या अधिक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2003 पासून आतापर्यंत किमान 150 हून अधिक माणसांचा बळी गेला आहे.

सामान्य ज्ञान
१) कोणत्या राज्याने अधिकाधिक जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे?
२) भारतीय रेल्वेची खास भक्तांसाठी सुरू झालेली रेल्वे कोणती?
३) सर्वात पुरातन वेद कोणता?
४) वातावरणातील आद्र्रता कशाने मोजतात?
५) ई-एमएमएस लष्कराच्या कोणत्या विभागाशी संबंधित आहे?
उत्तरे-१) तेलंगण २) भारत दर्शन टुरिस्ट ३) ऋग्वेद ४) सायक्रोमीटर  ५) भारतीय हवाई दल
     -संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली) 7038121012

No comments:

Post a Comment