Tuesday 23 June 2020

●●जागर-जागरण●●


संशोधन
प्लास्टिक कचऱ्यापासून हायड्रोजन गॅस!
'प्लास्टिक कचरा' ही एक मोठी डोकेदुखी आपल्यासह सगळ्याच देशांना भेडसावत आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे मुंबई शहराची 2005 मध्ये आणि त्यानंतर दरवर्षी काय अवस्था होते आहे,हे आपण पाहात आहोतच. प्लास्टिक कचरा जाळल्यानंतर त्यातून निघणारा विषारी दूर आजूबाजूच्या रहिवाशांना आजाराने  बाधित करून टाकत आहे. आपल्या देशात खूप मोठा प्लास्टिक कचरा जमा होत असून त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. आपल्या देशातल्या बहुतांश राज्यांनी प्लास्टिक पिशव्यांना वापरास बंदी घातली आहे. पण तरीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी झाला नाही. या प्लास्टिकचे काय करायचे असा प्रश्न सर्वच देशांना पडला आहे. यातून संशोधन सुरू आहे.
आता या प्लास्टिक कचऱ्याचा उपयोग आपल्याला फायद्यासाठीच करता येईल, अशी सुचिन्हे दिसत आहेत. ब्रिटन येथील चेस्टर विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी प्लास्टिक कचऱ्यातून हायड्रोजन गॅस निर्मिती करण्याचा चांगलाच उपाय शोधून काढला आहे. या हायड्रोजनचा उपयोग आपल्याला वाहनांमध्ये इंधन आणि वीज निर्मितीसाठी करता येणार आहे.
संशोधकांनी दावा केला आहे की, या प्रक्रियेत खूप कमी प्रमाणात मिथेन गॅसचे उत्सर्जन होईल. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. संशोधकांचे म्हणणे, असे की, प्लास्टिक कचऱ्याची समस्या झेलणाऱ्या समाजाला हा पर्याय चांगलाच साबीत होऊ शकतो. याच वर्षी पहिल्यांदाच या प्रक्रियेचा वापर चेशायरमध्ये एलेसमेरे पोर्टजवळ एका संयंत्रणेत केला जाणार आहे.
या प्रक्रियेत एका गरम भट्टीत प्लास्टिक कचरा टाकून हायड्रोजनसह काही गॅसचे उत्पादन केले जाणार आहे. या योजनेतून कधीच रिसायकलिंग न केलेल्या जवळपास 2.5 कोटी टन खराब प्लास्टिक कचऱ्याचा वापर केला जाणार आहे. यामुळे पेट्रोलियम पदार्थांचा वापर कमी होण्यास मदत होणार आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी हे एक चांगले पाऊल म्हटले पाहिजे
आपल्या देशातदेखील फार मोठी प्लास्टिक कचऱ्याची समस्याच आहे. पर्यावरण हानी तर होत आहेत,पण जनावरेदेखील प्लास्टिक खाऊन दगावत आहेत. आपल्या देशातसुद्धा अशा प्रकारची यंत्रणा उभी राहणे, आवश्यक आहे. नव्या साधनांचा वापर करून आपल्या देशापुढील समस्यांचे निराकरण व्हायला हवे.
विचार
खरे प्रेम
श्री श्री रविशंकर सांगतात, आपले हदय खूप जपून ठेवा. ते खूप नाजूक असते. छोट्या छोट्या गोष्टी
आणि घटनांचे त्याच्यावर गंभीर परिणाम होतात. ज्ञान
आणि विवेकाच्या कोंदणामुळे आपले हृदय दिव्यत्वाशी
जोडलेले राहू शकते. मन आणि हदय साफ आणि निरोगी ठेवण्यासाठी दिव्यत्वाशिवाय दुसरे उत्तम काहीही नाही. मग व्यतीत होणारा काळ आणि घटना
यांचा त्यांना स्पर्श होणार नाही व जखमाही करू शकणार नाही. एखादी व्यक्ती अतिशय प्रेम व्यक्त करते, तेव्हा काय प्रतिक्रिया द्यावी, हे आपल्याला समजत नाही. खरेखुरे प्रेम मिळविण्याची क्षमता प्रेम दिल्याने, प्रेम वाटल्याने प्राप्त होते. तुम्ही केंद्रित झाल्यावर तुमच्या अनुभवांच्या आधारावर प्रेम निव्वळ भावनाच नसून प्रेम तुमचे शाश्वत अस्तित्व असल्याचे
ज्ञात होईल. मग कोणी कितीही प्रेम, कोणत्याही रूपात व्यक्त केले तरी तुम्ही स्वत:ला आपल्या स्वचेतनेत स्थिर असलेले पाहाल. प्रेमाचे तीन प्रकार आहेत. १. आकर्षणाने मिळणारे २. सुखसुविधेमुळे मिळणारे
३. दिव्य प्रेम आकर्षणाने मिळणारे प्रेम क्षणिक असते; कारण ते अज्ञानामुळे वा मोहामुळे निर्माण होते. यामध्ये आकर्षण कमी होण्यासोबत मोहभंग होतो आणि तुम्हाला उबग येते. हळूहळू प्रेम कमी होत जाऊन त्याजागी भीती, अनिश्चितता, असुरक्षितता आणि
औदासिन्य येते. सुखसुविधेमुळे तयार झालेल्या प्रेमात घनिष्ठता असते, परंतु जोश, उत्साह आणि आनंद नसतो. उदा. आपण आपल्या नवीन मित्रापेक्षा जुन्या मित्राशी खूप आरामदायक आणि मोकळीक अनुभवतो. आपण त्यांना सुपरिचित असतो. या दोन्हींपेक्षा दिव्य प्रेम उत्कृष्ट आहे. ते सदाबहार आणि
नितनवीन राहते. जवळ जाल तितके ते आकर्षक आणि गहन होत जाते. याचा कधीही कंटाळा येणार नाही, उलट ते प्रत्येकाला उत्साही ठेवते. प्रापंचिक प्रेम सागराप्रमाणे असते; पण सागरालादेखील तळ आहेच ना? दिव्य प्रेम आकाशाप्रमाणे आहे- असीम, त्याला कोणतीही सीमा नसते. सागराच्या तळाऐवजी असीम आकाशात भरारी मारा. दिव्य प्रेम कोणत्याही नाते-संबंधापेक्षा श्रेष्ठ आणि सर्व नातेसंबंधांना सामावून घेणारे असते.
घडामोडी
भारतीय लष्कर
15 जानेवारीला देशात 72 वा लष्कर दिन साजरा करण्यात आला. भारतीय लष्कर हे संख्येच्या बळावर जगात तिसऱ्या क्रमांकाचे आहे. संसदेत सादर झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार लष्करात 12.37 लाख मनुष्यबळ आहे. तरीही त्यात 27 हजार 864 पदे रिकामी आहेत. प्रत्यक्ष रणभूमीवर पायदळाचा जवान लढत असतो आणि त्याला तोफखाना ,दारुगोळा, इंजिनिअर, सिग्नल्स असे विविध विभाग पूरक साहाय्य करतात. या पायदलाच्या जवानाला अधिकाधिक तंत्रकुशल करण्याचा लष्कराचा इरादा आहे. डिजिटल रणभूमी ही संकल्पना रुजू घातली आहे. इंटरनेटवर आधारित असलेली नेटसेन्ट्रीक वॉरफेअर ही युद्धखेळी आता सागरी युद्धाप्रमाणेच रणांगणावरील जवानाला आत्मसात करावी लागणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला अजूनही पारंपरिक युद्ध, छुपे युद्ध, घुसखोरी ही आव्हाने भारतापुढे कायम आहेत. त्यामुळे पारंपरिक युद्धातील सामुग्री लगेच मोडीत काढता येणार नाही. रणगाड्यांची गरज आजही आहे. पण तेही आता स्मार्टच लागतील. सध्या टी-90 हेच अत्याधुनिक रणगाडे भारताच्या ताफ्यात आहेत. अर्जुन या स्वदेशी बनावटीच्या रणगाड्याने अजूनपर्यंत तरी समाधानकारक कामगिरी केलेली नाही.जवानांच्या हातातले सर्वात महत्त्वाचे हत्यार म्हणजे रायफल. यापूर्वी वजन, सुलभता अशा बदलांनीशी 'इंसास' ही रायफल वापरले जात आहे. तिच्या गोळ्यांचा व्यास 5.56मिमी होता व आपल्या लक्ष्याला जखमी करणे इतकेच आपल्या शस्त्राचे उद्दिष्ट होते. आता मात्र आपले सावज संपूर्णपणे नेस्तनाबूत करणे, गरज पडल्यास बेछूट फ़ैरी झाडून पूर्ण परिसर गारद करता आला पाहिजे हे उद्दिष्ट शत्रूच्या बदलत्या रुपानुसारच तयार झाले. नव्या रायफलींच्या गोळ्यांचा व्यास 7.62 मिमी करण्यात आला असून त्याद्वारे शत्रू ठार होईल,हेच उद्दिष्ट आहे. आधीच्या रायफलींची लांबी जास्त होती, ती कमी असावी व वजनाने हलकीशी असावी, असाही प्रयत्न नव्या रायफलींमध्ये करण्यात आला आहे.
सुविचार
कधीही न बदलणारे लोक दोनच-अत्यंत विद्वान आणि अत्यंत मूर्ख- कन्फ्युशियस
संशोधन
पतंगाचा उपयोग
बेंजामिन फ्रॅंकलिन यांनी पतंगाचा वापर करून ढगांमध्ये निर्माण होणारी वीज आणि प्रयोगशाळेत घर्षणाने निर्माण होणारी वीज या दोन्हींची एकरूपता दाखवून दिली. यासाठी त्यांनी आभाळात पतंग उंच उडवला. त्यावेळी आकाशातील ढगांमध्ये वीज चमकत होती. परंतु पतंगाला जोडलेला दोरा विजवाहक नसल्यामुळे ढगांमधील वीज खाली पोहचू शकत नव्हती. पाऊस सुरू होताच दोरा ओला झाला आणि विजेचा वाहक बनला. त्यामुळे वीज खाली पोचून ठिणगी उडाली आणि दोन्ही विजा एकच असल्याचे सिद्ध झाले. मार्कोनी यांनी पतंगाचा वापर करून अँटेना आकाशात उंचावर नेला आणि त्याच्या मदतीने अटलांटिक महासागरापार रेडिओसंदेश पाठवण्यात यश मिळवले. विमान बनवण्यासाठी वैमानिकीतले प्रयोग करताना राइट बंधू आणि तळपदे यांच्यासहित अनेक संशोधकांना पतंगाची खूप मदत झाली. जास्तीत जास्त उंच पतंग उडवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियातील रॉबर्ट मूड यांच्या नावावर आहे. त्यांनी 2014 मध्ये पतंग 4879.54 मीटर उंच उडवून हा विक्रम केला. सर्वात मोठा पतंग उडवण्याचा विक्रम इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथील पतंगोत्सवात 2011 मध्ये करण्यात आला. हा पतंग तब्बल 10 हजार 971 चौरस फूट (1019 चौरस मीटर) क्षेत्रफळाचा होता. आपण सगळे करमणुकीसाठी पतंग उडवत असलो तरी शास्त्रज्ञ मात्र पतंगाचा उपयोग संशोधनासाठी करत आहेत.
बोधकथा
एकदा एक मनुष्य विवेकानंदांकडे आला आणि चक्क रडायला लागला. आपल्यातील दुर्गुण आणि वाईट सवयी यामुळे आपलं जगणं नरकासारखं झालं असून त्यातून आपल्याला बाहेरही पडता येत नाही, तेव्हा त्यावर उपाय मागण्यांची विनंती तो विवेकानंदांजवळ करत होता. विवेकानंदांनी आपल्या एका शिष्याला जवळ बोलावून त्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि नंतर काहीच वेळात त्या मनुष्याला आपल्याबरोबर बागेत फिरायला घेऊन गेले. बागेत त्यांचा शिष्य त्यांना एका झाडाला मिठी मारून बसलेला दिसला. आणि तो झाडाला, 'मला सोड, मला सोड' असं म्हणत होता. ते दृश्य बघून तो मनुष्य हसायला लागला आणि म्हणाला,'काय वेडा माणूस आहे हा.' त्यावर विवेकानंद स्मित करत म्हणाले,'तुझीदेखील अवस्था अशीच आहे. दुर्गुणांना तूच धरून ठेवले आहेस आणि सुटत नाही म्हणून तक्रारही तूच करतो आहेस.' तो मनुष्य ओशाळला आणि विवेकानंदांचा निरोप घेऊन गेला.
तात्पर्य: वाईट गोष्टींना कवटाळून आपणच बसलेलो असतो, ते दूर करण्याचे काम आपल्याच हातात आहे.
सिनेमा
आई झालेल्या अभिनेत्री
करिना कपूर आणि ऐश्वर्या रॉय अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. अनेक लोकप्रिय चित्रपट आणि मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. त्या दोघींची अभिनयाची स्वतःची अशी एक शैली आहे. करिना जरी घराणेशाहीतून पुढे आली असली तरी ती एक अफाट अभिनय क्षमता असणारी अभिनेत्री आहे. 'जब वुई मेट', 'देव', 'चमेली' यासारख्या चित्रपटांमधून तिनं आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवून घेतलं आहे. व्यावसायिक चित्रपट तसेच समांतर चित्रपट यांची सांगड आपल्या कारकिर्दीत तिने उत्तमपणे घातली आहे. ऐश्वर्या वर करिअरच्या सुरुवातीला 'प्लास्टिक डॉल' चा शिक्का बसला असला तरी कारकिर्दीच्या एका टप्प्यात तिनं अभिनयामध्ये प्रचंड सुधारणा घडवून आणली. 'रेनकोट', 'खाकी', 'देवदास' या चित्रपटांतील तिच्या अभिनयावर प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी पण पसंदीची मोहोर उमटवली. करिना, ऐश्वर्या यांच्यासारख्या अभिनेत्री आई झाल्यानंतरही ,त्यांच्यासाठी खास भूमिका लिहिल्या जात आहेत. इतकंच नाहीतर प्रेक्षकांमधील त्यांची लोकप्रियताही कायम आहे. तैमुरचा जन्म झाल्यावर लगेच करिनाने 'वीरे द वेडिंग' च्या चित्रीकरण पूर्ण केले. चार मैत्रिणींच्या घनिष्ट मैत्रीची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात करिनाने एका कणखर, लग्नानंतरही स्वतंत्र अस्तित्व जपणाऱ्या स्त्रीची भूमिका साकारली. आराध्याचा जन्म झाल्यावर ऐश्वर्यानेदेखील दिमाखात पुनरागमन केलं. करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपटात तिनं रणबीर कपूरसोबत भूमिका केली होती. अधिरा या गोड मुलीची आई असलेल्या राणी मुखर्जीने 'हिचकी' नावाचा वेगळा चित्रपट केला. रविना टंडन, श्रीदेवी, काजोल, लारा दत्ता यादेखील बॉलिवूड मध्ये आपले स्थान राखून आहेत. अनुष्का शर्माने तर अवघ्या 29 व्या वर्षी लग्न करून मोकळी झाली,पण याचा आपल्या करिअरला ब्रेक लागणार नाही,याची व्यवस्था तिने केली. यापूर्वी अभिनेत्रीने लग्न करणे म्हणजे प्रेक्षक किंवा चाहत्यांच्या दृष्टीने पापच होते. त्या चित्रपट सृष्टीतून बाहेर फेकल्या जात होत्या. त्यामुळे नायिका अगोदर लवकर लग्न करत नव्हत्या. पण आता ट्रेंड बदलला आहे. चाहत्यांनाही आता काही वाटेनासे झाले आहे. आता कथानकात आणि संहितेत अनेक अभिनव प्रयोग होता आहेत. साहजिकच मध्यमवयीन नायिकांना पण महत्त्व प्राप्त झालं आहे.
संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment