Thursday 4 June 2020

निसर्गाची काळजी घेऊ या

पृथ्वीवर सजीव आणि निर्जीव वास्तवात आहे. पूर्वीच्या काळापासून सजीव हे निसर्गावर अवलंबून आहे. सजीवातील सर्वात बुद्धिमान मानवजात तर निसर्गाच्या कुशीतच जन्म घेते. निसर्गाच्या कुशीतच अंतिम श्‍वास सोडते. मानवाला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा याच निसर्गातून मिळतात. मानव पूर्वी काळापासून आपल्या गरजा भागवत आहे. पुढे मात्र विज्ञानाने प्रगती केली. मानव शिक्षण घेऊन स्वत:ला विद्वान समजू लागला. त्याने त्याच्या गरजाचा विस्तार वाढवला. स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो हळूहळू या निसर्गाच्या जीवावर उठला.निसर्गातल्या अनेक गोष्टीचा र्मयादेपेक्षा जास्त उपभोग घेऊ लागला.त्यामुळे निसर्गाची परिस्थिती बिघडली.आजची परिस्थिती पाहता निसर्गाला दुष्परिणाम करणारे घटक प्रचंड प्रमाणात वाढत आहे.
यामध्ये प्रामुख्याने प्रदूषण, वाढते तापमान, पाणीटंचाई, औषधी वनस्पती नष्ट होणे, वाढती जंगलतोड, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर या गोष्टीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. या सर्व गोष्टी मानवाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. याचे परिणाम निश्‍चितच येणार्‍या काळात मानवाला भोगावे लागेल.आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाच्या प्रगतीने माणूस फार अंहकारी झाला आहे. तो स्वत:च्या प्रगतीसाठी निसर्गाच्या जीवावर उठलाय आहे. वाढते उद्योग धंदे, दळणवळणासाठी रस्ते, शहरीकरणामध्ये वाढत्या वसाहती यासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. झाडे लावणार्‍यांपेक्षा झाडे तोडणार्‍यांची संख्या अधिक आहे. आज सरकारला झाडे लावण्याची सर्वसामान्यांमध्ये जागृती करावी लागत आहे. यापेक्षा दुर्दैवी गोष्टी दुसरी कोणती. दरवर्षी धो धो पडणारा पाऊस उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचे सावट बनतो.कारण पडणार्‍या पावसाचे नियोजन होत नाही.पाणी आडवा पाणी जिरवा ही म्हण सगळे विसरून चालेले आहे.जो तो पाण्यासाठी पृथ्वीच्या पोटात नवीन छिद्र पाडण्यास दंग झाला आहे. ते थांबवायला मात्र कुणीही पुढे येत नाही. दरवर्षी तापमान नवीन उच्चांक गाठत आहे. या वाढत्या तापमानामुळे पृथ्वीचे संतुलन बिघडत चाललेले आहे. जंगलामध्ये आग लागत आहे. अनेक वृक्ष जळून खाक होत आहे. अनेक वृक्षांच्या जाती नष्ट होत आहे. असे म्हटले जाते की स्वत:वर बेतल्या शिवाय कोणत्याही गोष्टीचे महत्त्व कळत नाही. तसे निसर्गाचे कोपणे मानवाला कळायला वेळ लागणार नाही. वेळीच निसर्गाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्षतोड थांबवून वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. दरवर्षी प्रत्येकाने नवीन झाडे लावली पाहिजे. वाढदिवस, आनंदाचे क्षण झाड लावून साजरे केले पाहिजे. तो आनंदाचा क्षण झाडाच्या रूपाने टिकवून ठेवता येईल. नुसते झाडे लावून चालत नाही तर त्याचे संगोपन सुद्धा झाले पाहिजे. दरवर्षी पावसाळ्यात पडणार्‍या पावसाचे पाणी अडवले पाहिजे. जमिनीमध्ये जिरवले पाहिजे. यासाठी मोकळ्या जागेत खड्डे करून पाणी आडवा. हवेचे प्रदूषण होणार्‍या साधनांचा अतिवापर वापर टाळावा. ही पृथ्वी, निसर्ग प्रत्येकाचा आहे. त्याचे संगोपन व संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे वेळीच ओळखले पाहिजे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर जपून केला पाहिजे. नैसर्गिक साधन संपत्ती दीर्घकाळ टिकली पाहिजे. निसर्ग संवर्धन काळाची गरज आहे हे वेळीच ओळखून सर्वजण प्रयत्न करूया व निसर्गाचे सौंदर्य अबाधित राहूया.

No comments:

Post a Comment