Sunday 14 June 2020

कवी शंकर वैद्य

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला , पालखीचे भोई अशा एकाहून एक सरस तसंच दर्जेदार काव्यरचनांची निर्मिती करणारे प्रसिध्द कवी व साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म १५ जून १९२८ रोजी पुणे जिल्ह्यातील ओतूर या गावी झाला. घर गावाच्या उत्तर टोकाला. अडीच मजली, सात खणी घर. घराभोवती भरपूर झाडी! कडुनिंब. चिंच. कवठी. बोरी. फुलांनी सदैव टवटवलेला प्राजक्त. घराच्या मागल्या अंगणात बहरलेला जाईचा मांडव. घरापासून आंबराईही लांब नव्हती. झाडाफुलांच्या या सहवासात शंकर वैद्यांचं बालपण आणि किशोरपणीचा काळ गेला. मात्र, नंतरच्या काळात त्यांचं विश्व बदललं आणि विविध अनुभवांचं जग त्यांना बिलगू लागलं. बालपणी ज्या निसर्गावर त्यांनी प्रेम केलं, त्याची छाया त्यांना लाभली. हा निसर्गच त्यांच्या कवितांना पोषक ठरला.

ओतूर सोडून १९४१ साली माध्यमिक शिक्षण घेण्याकरिता ते जुन्नरला आले. जुन्नरचं वातावरण एकदम वेगळं. शिवाजीमहाराजांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला गावापासून अगदी जवळ. जाता-येता तो सहज दिसे. तेव्हा सारं वातावरण पारतंत्र्याच्या जाणिवेनं झाकोळलेलं होतं. बेचाळीस साल उजाडलं. क्रांतीचं वारं वाहू लागलं.
एकदा बालदिनी पोवाडे म्हणण्याचं काम छोटय़ा शंकरकडे आलं. त्यावेळी कौतुक म्हणून कवितांचं पुस्तक त्यांना बक्षीस मिळालं. त्यांना खूप आनंद झाला. त्यातल्या कविता आंतरिक ओढीनं त्यांनी वाचल्या. त्यातून आणि घेतलेल्या अनुभवांतून त्यांच्या मनात कवितेची पाऊलवाट तयार झाली. त्या वाटेवरून चालताना शब्दांतून त्यांना दृश्यं दिसू लागली. प्रत्येक कविता वेगवेगळ्या स्वभावाची, रंगाची आहे असं त्यांना वाटू लागलं. ओतूरमध्ये १५ जून १९२८ रोजी झाला. लहानपणापासूनच शंकर वैद्य यांना कवितांची गोडी होती. ही आवड जपत असतानाच त्यांना साहित्य व कवितांची गोडी लागली. आला क्षण, गेला क्षण हा वैद्य यांचा पहिला कथासंग्रह, तर कालस्वर हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होय.
वैद्य यांचे माध्यमिक शिक्षण पुण्यातील जुन्नर तालुक्यामध्ये झाले. पुढे पुणे विद्यापीठातून बीए आणि एमएचे शिक्षण पूर्ण केल्यावर शंकर वैद्य यांनी सात वर्ष शासनाच्या शेती विभागात नोकरीही केली. या दरम्यान त्यांचे कव्य लेखन सुरूच होते. त्यांचे सांजगुच्छ, दर्शन, मैफल, पक्षांच्या आठवणी हे काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध असून, कुसुमाग्रजांच्या रथयात्रा आणि प्रवासी पक्षी या पुस्तकांचं हिंदी रूपांतर केले आहे.
काव्यसमीक्षक म्हणूनही वैद्य काम पाहिले आहे. भूपाळी कशी म्हणावी, दिंडी कशी वाचावी, शादरुलविक्रिडित म्हणताना काय दक्षता घ्यावी, याचे शिक्षण त्यांनी शालेय जीवनातच मिळवले होते. याच काळात संत-पंत काव्याचा परिचय देखील त्यांना झाला. त्यामुळेच सर्व तर्‍हेचे काव्यरस शोषून घेत त्यांची स्वत:ची, स्वजाणिवेची कविता प्रकटली आणि ती रसिकमान्यही झाली. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे मुख्य वैशिष्ट्य होते त्यामुळे, नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा. निसर्गरम्य वातावरणात शंकर वैद्य यांचे बालपण गेल्याने त्यांच्या कवितांमधूनही निसर्गप्रेम प्रगट व्हायचे. शंकर वैद्य यांनी आकाशवाणीवरुन कव्यवाचनही केले व त्यांचा हा कार्यक्रम लोकप्रिय ठरला होता. कवी व साहित्यिक यापलिकडे कुशल वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही त्यांची ख्याती होती. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल शंकर वैद्य यांना महाराष्ट्र शासन, कोकण मराठी साहित्य परिषद, मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानच्या पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment