Monday 22 June 2020

नाग: महाराष्ट्रातला आणि भारतातला

गडद तपकिरी किंवा काळे नाग राजस्थान, पंजाब,हरियाणा या भागात दिसतात. या नागांच्या फण्यांच्या  मागच्या बाजूला कोणतंही चिन्ह दिसत नाही. त्याची लांबी सुमारे 1.4 मीटर एवढी असते. काळ्या नागालाच डोम्या नाग (black cobra-Naza Oxiana) असंही म्हणतात. महाराष्ट्रात नागाची एकच जात आढळते. त्याला नाग (Indian Cobra) म्हणतात. या नागाचं प्राणी शास्त्रीय नाव Naja Naja (उच्चार-नाजा नाजा) असं आहे. हे प्राणी शास्त्रीय नाव मूळ 'नाग' या संस्कृत शब्दावरून आलं आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या नागांचा रंग पिवळसर किंवा गव्हाळी असतो. नागाची मादी सुमारे 10 ते 12 अंडी घालते आणि स्वतःच्या शरीराची चुंबळ करून अंड्यावर बसते. ती अधूनमधून स्वतःच्या शरीराचे चुंबळीतील वेढे एकमेकांवर घासून काही प्रमाणात ऊब निर्माण करत असावी आणि ती ऊब अंड्यांना देत असावी.
अंडी घालणाऱ्या सापांना अंडज (Oviparous) असं म्हणतात. अजगर,मण्यार, धामण, नाग ही अंडज सापांची उदाहरणं आहेत. हरणटोळ, फुरसे, घोणस, चापडा (म्हणजे Bamboo Pit Viper) हे साप पिलांना जन्म देतात. अशा सापांना जारज (Ovo-viviparous) असं म्हणतात. नागाची मादी अंडी घालते. आणि त्यातून पिल्लं बाहेर येतात. पिल्लांना जन्मताच विषदन्त आणि विषग्रंथी असल्यामुळे ती विषारी असतात. नागाचं विष -न्यूरॉटॉक्सिक ( Neurotoxic ) असतं. म्हणजे त्याचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो. ज्या ठिकाणी दंश झालेला असेल त्या ठिकाणी आग होऊन सूज येते. अंग जड होऊन पेंग येते. हातपाय गळून गेल्यासारखे वाटतात. तोंडातून लाळ गळायला लागते. घाम फुटतो. जीभ जड झाल्यामुळे पेशंटला स्पष्ट शब्दोच्चार करता येत नाही. सरतेशेवटी respiratory paralysis होऊन मृत्यू ओढवतो. यावर उपाय तसा एकमेव आहे- तो म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली विष प्रतिबंधक लस (Anti-snake Venom) टोचणे. हे औषध सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये उपलब्ध असतं. नागाची सरासरी लांबी एक ते दोन मीटर एवढी असते. नाग त्याच्या उंचीच्या 1/3 एवढा जमिनीवर उभा राहू शकतो. फणा काढल्यामुळे तो वास्तवापेक्षा मोठा दिसतो. फणा उभारलेला नाग त्याच्या गरुडासारख्या भक्षकांच्या नजरेला मोडीतला दहाचा आकडा सहज दिसू शकतो. नागाचा नैसर्गिक अधिवास (Natural habitat) कोणता? याचं उत्तर एक प्रकारे जिथे उंदीर तिथे नाग असं द्यावं लागेल. मनुष्य वस्त्या, घरं, शेतीवाडी, विरळ जंगलं, झुडपी रानं, ओढे-नाले अशा निवासस्थानांमध्ये नाग आढळतो. सूक्ष्म अधिवासांचा विचार केला तर खबदडीच्या जागा ,शेतांच्या ताली, वाळव्यांनी सोडून दिलेली बीळे, केवड्याचं बन आणि चंदनाच्या झाडांचं प्राबल्य असलेली वनराई या नागाच्या खास लाडक्या जागा. नागराज किंवा भुजंग (king cobra) हा सरासरी पाच मीटर लांबीचा हा साप गोवा, कर्नाटक, ओरिसा, आसाम आणि पश्चिम बंगाल (विशेषतः सुंदरबन) मध्ये आढळतो. हा साप महाराष्ट्रात आढळत नाही. हा नागराज किंवा राजनाग फक्त घनदाट जंगलांमध्ये आणि पाणथळी भागात राहतो. नागराजाचं प्राणिशास्त्रीय नाव Ophiophagus hannah असं आहे. Ophio चा अर्थ साप आणि phagus म्हणजे खाणारा. नागराज इतर सापांना खाऊन जगतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली) 7038121012

No comments:

Post a Comment