Wednesday 3 October 2018

गीता गोपीनाथ

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख आर्थिक सल्लागारपदी नुकतीच गीता गोपीनाथ यांची नियुक्ती झाली असून त्यांच्या नेमणुकीने हे पद दुसर्‍यांदा भारतीयाकडे आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हेही काही काळ आयएमएफचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते. अवघ्या ४६ वर्षांच्या असणार्‍या गीता या आयएमएफमध्ये हे पद सांभाळणार्‍या पहिल्या महिला ठरल्या आहेत. १९९0 मध्ये चंद्रशेखर सरकार असताना भारतावर सोने गहाण ठेवण्याची वेळ आली होती. ते वाचताना धक्का बसलेल्या गीता यांनी अर्थतज्ज्ञ होण्याचे निश्‍चित केले होते. 
गीता गोपीनाथ या म्हैसूरमध्ये जन्मलेल्या असून सध्या हॉर्वर्ड विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. गीता यांचे वडील टी. व्ही. गोपीनाथ हे हाडाचे शेतकरी आणि उद्योजक. तर त्यांचे आजोबा गोविंद नंबियार हे कम्युनिस्ट चळवळीतील. आई ए. के. गोपालन या ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्याच्या नातलग. स्वाभाविकच, गीता यांच्यावरही काही काळ कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव पडला. गीता यांचा जन्म जरी कर्नाटकात झाला असला तरी हे कुटुंब मूळ केरळचे. गीता यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण भारतातच घेतले. त्यांनी राजधानी दिल्लीतील लेडी श्रीराम महाविद्यालयातून १९९२ साली बी.ए.ची पदवी प्राप्त केली. तर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनामिक्समधून एम.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर १९९४ साली त्यांनी वॉशिंग्टन गाठले. तिथे १९९६ ते २00१ पर्यंत त्यांनी प्रिन्सटन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर शिकागो विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून त्या रुजू झाल्या. तर २00५ मध्ये त्यांची हार्वर्ड विद्यापीठात निवड झाली. आजवर अनेक विषयांवरचे ४0हून अधिक शोधनिबंध गीता यांच्या नावावर आहेत. गीता यांचे पती इक्बालसिंग धाडीवाल हेही अर्थतज्ज्ञ आहेत आणि ते आयएएस परीक्षेत चमकले होते.
काही दिवसांपूर्वी केरळमधील डाव्या सरकारने गीता यांना अर्थसल्लागार म्हणून नेमले, तेव्हा स्वाभाविक वादळ उठले. कारण, गीता या वेगवान आर्थिक सुधारणांच्या पक्षाच्या आहेत. या नियुक्तीने सन्मानित झाल्यासारखे वाटते, अशी प्रतिक्रिया गीता यांनी दिली होती. यापूर्वी २0१४ मध्ये जगातील निवडक २५ तरुण अर्थतज्ज्ञांमध्ये गीता यांची निवड झाली होती. ती आता अधिकच सार्थ ठरली आहे.

No comments:

Post a Comment