Saturday 6 October 2018

नृत्ययामिनी: डॉ. सुचेता भिडे-चाफेकर.

कोणतीही कला म्हटली की राजाश्रयाबरोबरच लोकाश्रय देखील महत्त्वाचा असतो. केवळ संस्कृती टिकवण्याकरता कलेची जोपासना करणं काहींना मान्य नसतं. शास्त्रीय संगीत काय किंवा शास्त्रीय नृत्य काय काहीजणांच्या आकलनशक्ती बाहेरची ही गोष्ट. कारण अर्थातच अतिशय अवघड, किचकट नि खर्‍या अर्थाने शास्त्रोक्त भाषेतील रचना आणि त्याही तामिळ, तेलगू आणि कर्नाटकी भाषेतल्या. त्यामुळेच आवड असूनही रसिक प्रेक्षक शास्त्रीय नृत्याला हवा तसा प्रतिसाद देत नाहीत. हेच लक्षात घेऊन भरतनाट्यम सारख्या मूळच्या दाक्षिणात्य असलेल्या या नृत्यकलेतील रचना, मराठी शैलीतील सहजसुंदर भाषेत रसिकांना रुचेल, पचेल अशा भाषेत सादर करण्याची किमया एका मराठमोळ्या नृत्यांगनेने केली. आणि नृत्यकलेच्या क्षेत्रात ‘तिच्या सम तीच’ ही उक्ती सार्थ ठरवत देश-विदेशात भरतनाट्यमला नवी ओळख मिळवून दिली ती स्त्री म्हणजेच डॉ. सुचेता भिडे-चाफेकर. सुचेताताईंना कलेचा वारसा घरातच लाभलेला. 6 डिसेंबर 1948 ला जन्मलेल्या सुचेताताईंचे वडील विश्‍वनाथ भिडे उत्तम कलावंत. तर आई वीणा संगीताची चाहती. विशेष म्हणजे सुचेताताईंचे यजमान डॉ. विजय चाफेकर यांना देखील नृत्याची आवड असल्याने त्यांनीही त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले. सुचेताताई भरतनाट्यम या प्रकारातल्या उत्तम नृत्यांगना. गुरू-शिष्य परंपरेत मुंबईतील आचार्य पार्वती कुमार, तंजावरचे गुरू के.पी. पिटप्पा आणि बालसरस्वती यांच्याकडे सुचेताताईंनी गुरूशिष्य परंपरेंतर्गत नृत्याचं शिक्षण घेतलं. मुंबई विद्यापीठाची मास्टर ऑफ फाइन आर्टस ही नृत्यातील पदविका मिळवलेल्या सुचेताताईंनी संगीताचार्य या विषयात डॉक्टरेट देखील मिळवली आहे. नृत्या बरोबरच त्यांनी कर्नाटक संगीताचे आठ वर्षं प्रशिक्षण देखील घेतलेले आहे. गेली चाळीस वर्षं त्या नृत्यकलेच्या क्षेत्रात एक नृत्यांगना, शिक्षिका आणि नृत्य दिग्दर्शिका म्हणून अखंडपणे कार्यरत आहेत. नृत्यातील विशुद्धता, तंत्र आणि नवे शोध याला तसेच मुख्य अभिनय आणि संगीताचा अचूक मेळ याला सुचेताताई महत्त्व देतात. सुचेताताईंनी 1964 पासून भारत आणि भारताबाहेर विविध महोत्सवातून नृत्याचं सादरीकरण केलेलं आहे. सवाई गंधर्व फेस्टिव्हल, खजुराव फेस्टिव्हल, वाराणसीतील गंगा महोत्सव, आग्रा येथील शारदोत्सव, मद्रास मधील पोंगल फेस्टिव्हल अशा मानाच्या महोत्सवांध्ये तर त्याचवेळी लंडन, पॅरिस, फ्रान्स, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया इत्यादी अनेक देशांमध्ये त्यांनी भरतनाट्यम नृत्याचे यशस्वी सादरीकरण केलेले आहे. दूरदर्शनच्या टॉप ग्रेड आर्टिस्ट असलेल्या सुचेताताईंनी दूरदर्शनवर कला आणि नायिका याच विषयावर नृत्यावर आधारित मालिका देखील सादर केलेली आहे. सुचेताताई गेल्या पंचवीस वर्षांपासून कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून भरतनाट्यमचं शास्त्रोक्त प्रशिक्षण नव्या पिढीला देत आहेत. त्यांच्या याच संस्थेच्या प्रशिक्षणाला शासनमान्यता देखील मिळाली आहे. अर्थात स्मिता महाजन, अरूंधती पटवर्धन, निलीमा काधे इत्यादी आघाडीच्या नृत्यांगना या सुचेताताईंच्याच शिष्या होत. भरतनाट्यम नृत्यकलेतील सुचेताताईंचे विशेष योगदान म्हणजे तंजावर मराठा राजाच्या सतरा ते एकोणिसाव्या शतका दरम्यानच्या अपरिचित मराठी रचनांचा शोध घेऊन त्याचं सादरीकरण सुचेताताईंनी केलं असून त्यांनी मराठी, हिंदी आणि संस्कृत रचना शोधल्या. या कामासाठी संगीत-नाटक अकादमीची विशेष सन्माननीय शिष्यवृत्ती देखील त्यांना लाभली. सुचेताताईंनी नृत्यगंना या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वत:च्या पंच्याहत्तर नव्या रचना देखील निर्माण केल्या. शिवाय नृत्यालिका हे भरतनाट्यम मधील शास्त्रशुद्ध रचनांवर आधारित पुस्तक देखील त्यांनी लिहिलेलं आहे. पंडित नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियावर आधारित नृत्यांजली, रविंद्रनाथांच्या कवितांवर आधारित साँग्ज ऑफ टागोर ही नृत्यांजली त्यांनी सादर केलेली आहे. भरतनाट्यम हा प्रकार तमिळ, कर्नाटक आणि तेलगू या भाषिक आविष्काराचा भाग होता. तो सुचेताताईंनी प्रयोग करून मराठीत आणला. आणि भरतनाट्यम या प्रकाराकरता रसिक प्रेक्षकांची ओढी वाढवली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि भरतनाट्यम या नृत्याचा उत्तम मेळ घालत त्यांनी नव्या फ्युजनची निर्मिती देखील केली. सुचेताताईंच्या या नृत्य कारकिर्दीबद्दल त्यांचा महाराष्ट्र गौरव, नृत्यविलास, नॅशनल अ‍ॅवॉर्ड ऑफ संगीत अकादमी अशा अनेक पुरस्करांनी यशोचीत सन्मान केला गेला आहे. एकूणच नृत्यकलेसाठी आपलं संपूर्ण जीवन वाहणार्‍या डॉ. सुचेताताईंसारख्या शास्त्रोक्त नृत्यांगना म्हणजे आजच्या काळातील नृत्ययामिनीच ठरतात.

No comments:

Post a Comment