Tuesday 9 October 2018

नादिया मुराद

युद्धातील लैंगिक हिंसाचाराविरोधात केलेल्या कामाबद्दल नादिया मुराद आणि कांगोचे डॉ. डेनिस मुकवेगे यांना २0१८ सालचा मानाचा नोबेल शांतता पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. स्वत: बलात्काराची शिकार ठरलेल्या नादियाने लैंगिक अत्याचाराविरोधातील लढाई लढतानाच जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उल्लेखनीय काम केल्यानेच त्यांचा गौरव करण्यात येत आहे. यंदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी ३३१ जणांची नावे आली होती. त्यातून मुकवेगे यांच्यासह नादिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आतापर्यंत ९८ जणांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यात १0४ लोकांचा आणि २७ संघटनांचा समावेश आहे. १९९३ मध्ये जन्मलेल्या नादिया या इराकच्या असून त्या यजिदी समुदायातील आहेत. इसीस या दहशतवादी संघटनेने त्यांचे अपहरण केले होते. त्यांच्यावर या दहशतवाद्यांनी अनेकदा बलात्कार करून त्यांचे शोषण केले होते. त्यांना इसीसची'सेक्स स्लेव्ह'ही म्हटले जाते. या दहशतवाद्यांच्या तावडीतून पळाल्यानंतर नादिया यांनी जगभरातील महिलांच्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत जनजागृती करण्याचे काम केले. त्यांनी लिहिलेले द लास्ट गर्ल, माय फाईट अगेन्स द इस्लामिक स्टेट ही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. संघर्षग्रस्त आणि युद्धग्रस्त भागामध्ये महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार थांबावेत यासाठी नादिया प्रयत्नशिल आहेत. इसीसच्या दहशतवाद्यांनी २0१४ मध्ये अपहरण केले होते. तीन महिने बंदी बनवून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला होता. इसीसचा ताबा येण्यापूर्वी त्या आई आणि भावंडासोबत उत्तर इराकच्या शिंजाजवळील कोचू गावात राहत होत्या. उदरनिर्वाह शेतीवरच चालत होता. ३ ऑगस्ट २0१४ रोजी इसीसने याजिदी लोकांवर हल्ला केला. तेव्हा त्यांच्या गावावर हल्ला होणार असल्याची कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. ''मला एका पुरुषाला विकण्यात आले. त्याला माझ्यासाठी काही कपडे विकत घ्यायचे होते आणि नंतर मला विकण्याचा त्याचा मानस होता. तो कपडे आणण्यासाठी बाहेर गेला. मी घरी एकटीच होते. मी तिथून पळून गेले. मी मोसूलच्या गल्लीबोळातून पळू लागले. मी एका मुस्लिम कुटुंबाचं घर ठोठावलं. मी त्यांना माझी हकीकत सांगितली. त्यांनी माझी मदत केली. कुर्दिस्तानच्या सीमेपर्यंत येण्यासाठी त्यांनी माझी मदत केली.'' तिच्या मुखातून निघणारे शब्द दु:खाचे वादळ घेऊन येतात. आता नादियाला नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यामुळे लैंगिक अत्याचाराविरुद्ध लढणार्‍यांना बळ मिळणार आहे. 

No comments:

Post a Comment