Saturday 6 October 2018

चंदा कोचर

चं दा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला. अलीकडे व्हिडीओकॉन समूहाला कर्ज मंजूर करणार्‍या समितीवर त्या होत्या आणि कर्जमंजुरी करताना त्यांनी बँकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ५७ वर्षीय चंदा कोचर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ३१ मार्च २0१९ रोजी संपणार होता. परंतु, प्रदीर्घ कारकीर्दीचा अशा तर्‍हेने अकाली अस्त झाला. कोचर यांच्याविरोधात असलेल्या आरोपांबाबत चौकशीचा ससेमिरा मात्र कायम राहणार आहे.
जपान बिझनेस फोरमच्या तसेच युएस इंडिया सीईओफोरम व्यापार मंडळाच्या त्या सदस्य आहेत.भारतीय बँक संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. आयसीआयसीआय वडोदरा संचालक मंडळाच्या त्या प्रमुख आहेत.तसेच इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्स तसेच नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्के ट या संस्थांच्या संचालक मंडळावर आहेत. कोचर यांचा जन्म १७ नोव्हेंबर, १९६१ रोजी जोधपूर, राजस्थान येथे झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट अँजेला सोफिया स्कूल, जयपूर येथे झाल्यानंतर त्या मुंबईला आल्या व मुंबईच्या जयहिंद महाविद्यालयातून कला शाखेतून पदवीधर झाल्या.यानंतर त्यांनी 'आयसीडब्ल्यूएआय'चा कोर्स पूर्ण केला.कॉस्ट अकाउंटिंग विषयातील प्राविण्यासाठी त्यांना जे.एन. बोस सुवर्ण पदक मिळाले.कोचर यांनी जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेतून एम.बी.ए.ची पदवी घेतली आहे. व्यवस्थापन शास्त्रात कोचर यांना वोकहार्ड सुवर्णपदक मिळाले.
१९८४ साली आयसीआयसीआय बँकेत रूजू झालेल्या कोचर २00१ मध्ये याच बँकेच्या संचालक म्हणून निवडल्या गेल्या. १९९0 च्या दशकात कोचर यांनी आयसीआयसीआय बँक स्थापन करण्यात मोठा भाग घेतला. १९९३ मध्ये ही बँक स्थापन करणार्‍या अंतरक गटामध्ये कोचर यांची निवड झाली.१९९४ मध्ये सहायक महाव्यवस्थापक आणि १९९६ मध्ये उपमहाव्यवस्थापक म्हणून त्यांची पदोन्नती झाली. कोचर यांच्या नेतृत्वाखाली २0१७ साली आयसीआयसीआय बँकेने सलग चौथ्या वर्षी भारतातील सर्वोत्तम किरकोळ बँक हा 'द एशियन बँकर' या मासिकाचा किताब पटकावला. 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या वार्षिक बैठकीच्या त्या २0११ मध्ये उपाध्यक्ष होत्या. २0१५-१६ मध्ये जगातील ३0 देशातील सुमारे ७0 उद्योगांना एकत्रित आणणार्‍या इंटरनॅशनल मॉनेटरी कॉन्फरन्स या संस्थेच्या त्या अध्यक्ष होत्या.

No comments:

Post a Comment