Saturday 6 October 2018

केशवसुत

कृष्णाजी केशव दामले हे मराठी साहित्यात केशवसुत नावाने प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १८६६ रोजी झाला.मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणार्‍या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत. इंग्रजी काव्य परंपरेतील रोमॅण्टिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणण्याचा मान केशवसुतांकडे जातो. कवी प्रतिभा स्वतंत्र असावी, कवीच्या अंत:स्फूर्तीखेरीज ती अन्य बाह्य प्रभावात ती असू नये. काव्य हुकुमानुसार नसते, नसावे, हा वास्तववाद मराठीत त्यांनीच आधुनिक परिभाषेत मांडला. त्यांच्या काव्य विचारांवर विल्यम वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींचा मोठा प्रभाव होता. पण त्यांची आविष्कार शैली भारतीय होती. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यांच्या या अल्पसंख्य कवितांमध्ये अन्याय, विषमता, अंधर्शद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्रीपुरुषांमधील प्रेम, त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्त्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी सहजी हाताळले आहेत.

No comments:

Post a Comment