Thursday 4 October 2018

सलग अकराव्या वर्षी मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांनी सलग अकराव्या वर्षी आपले स्थान अबाधित राखले आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत ४७.३ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीचे धनी असलेल्या अंबानी यांनी पहिला क्रमांक पटकावला असून एका वर्षात सर्वात जास्त संपत्ती मिळवणार्‍या व्यक्तींच्या यादीतही ते सर्वोच्च स्थानी आहेत.
रिलायन्स जिओ आणि ब्रॉडबॅन्डच्या यशामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वर्षभरात ९.३ अब्ज डॉलर म्हणजेच ६८,६१0 कोटींची वाढ झाली आहे. तसंच श्रीमंतांच्या यादीत विप्रोचे अध्यक्ष अजिम प्रेमजी हे यादीत दुसर्‍या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २१00 अब्ज डॉलर इतकी आहे. तर या यादीत तिसर्‍या स्थानावर आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल हे असून त्यांची संपत्ती १८.३ अब्ज डॉलर इतकी आहे. श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर असलेल्या हिंदुजा बंधूंची संपत्ती १८ अब्ज डॉलर इतकी आहे. तर १५.७ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसह पालोनजी मिस्त्री पाचव्या स्थानावर आहेत. तसंच या टॉप १0 श्रीमंतांच्या यादीत शिव नाडर (१४.६ अब्ज डॉलर), गोदरेज फैमिली (१४ अब्ज डॉलर), दिलीप संघवी (१२.६ अब्ज डॉलर), कुमारमंगलम बिर्ला (१२.५ अरब डॉलर), गौतम अदानी (११.९अरब डॉलर) यांचा देखील समावेश आहे.
फोर्बस् आशियाची संपादक नाजनीन करमाली म्हणाल्या की, भारतासाठी हे आव्हानात्मक वर्ष आहे. कारण रुपया डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. तरीही अव्वल शंभर श्रीमंत आपली संपत्ती वाचवण्यात यशस्वी ठरले आहेत. शिवाय नव्या अब्जाधीशांची संख्याही वाढलेली आहे. यावरून लक्षात येते की भारतात उद्योजकता वाढत असल्याचे हे द्योतक आहे. टक्केवारीच्या हिशेबाने बायोटेक उद्योजिका किरण मजुमदार शॉ यांची संपत्ती सर्वाधिक वाढून ६६.७ टक्क्यांवरून ३.६ अब्जांवर पोहोचली आहे. त्या यादीत ३९ व्या स्थानावर आहेत. १00 श्रीमंतांची संपत्ती एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक वाढली असल्याचे करमाली यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment