Wednesday 3 October 2018

सरकारी कर्मचार्‍यांच्या २४ लाख जागा रिक्त

एकीकडे देशात बेरोजगारीचे संकट 'आ'वासून उभे असतानाच दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये २४ लाख जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी सरकार नोकरभरती का करत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
संसदेत सरकारकडून वेळोवेळी दिल्या गेलेल्या माहितीचे संकलन केल्यावर ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यातील सर्वाधिक जागा शिक्षणक्षेत्रातल्या असून प्राथमिक शिक्षकांच्या ९ लाख जागा रिक्त आहे. मार्चमध्ये सरकारकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार, नागरी आणि सशस्त्र पोलिस दलांमध्ये साडेचार लाख पदे रिक्त आहेत. यातील कुठल्याच पदांसाठी सरकारने अजूनतरी नोकरभरती केलेली नाही. न्यायालयांमध्ये ५८५३ जागा, अंगणवाडी सेविकांच्या २ लाख जागा आणि टपाल खात्यामध्ये ५४ हजार जागा रिक्त असल्याचीही माहिती समोर आली आहे. संरक्षण खात्यातही मोठय़ा प्रमाणात जागा रिक्त आहेत. सशस्त्र सैन्यदलात ६२ हजार तर पॅरामिलिटरीत ६१हजार जागा रिक्त आहेत. दरम्यान रेल्वेमध्ये अडीच लाख जागा रिक्त असून यातील बहुसंख्य जागांच्या नोकरभरतीसाठी नुकतीच रेल्वेने नोटीस जाहीर केली आहे. या महत्त्वाच्या खात्यांशिवाय इतरही खात्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात जागा रिक्त असून नोकरभरतीचा मात्र पत्ता नाही. भारतामध्ये तीन कोटीहून अधिक युवक आज बेरोजगार आहेत. अशा परिस्थितीत सरकार या २४ लाख जागा कधी भरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेत.

No comments:

Post a Comment