Wednesday 3 October 2018

केशवराव भोसले

केशवराव भोसले हे मराठी संगीत नाट्यरंगभूमीवरील एक अतिशय गुणी नट आणि उत्तम गायक होते. केशवरावांचा जन्म ९ ऑगस्ट १८९0 रोजी कोल्हापूरमध्ये झाला. वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षी त्यांनी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला. संगीत शारदा ह्या नाटकातील मूर्तिमंत भीती उभी ह्या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीवार्दाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. ह्या नाटक मंडळींचे पहिले नाटक संगीत सौभद्र १९0८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सदर केले गेले. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रातही सदर केले गेले. केशवराव महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळे प्रेक्षकांना हे नाटक विशेष आवडले. केशवरावांनी संस्कृत नाटक शाकुंतलमध्ये सुद्धा काम केले. त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथे झाला. वेल्वेट कापडाचा पडदा प्रथमच मराठी रंगभूमीवर वापरण्यात आला होता. केशवराव हे कलाप्रेमी आणि चतुर होते. त्यांनी १९२१ साली संयुक्त मानापमान नाटकात बालगंधर्व यांच्याबरोबर काम केले. मामा वारेरकर यांच्या संगीत संन्याशाचा संसार या नाटकातील केशवरावांची डेविडची भूमिका अविस्मरणीय आहे. संगीत नाटकांमधील त्यांच्या अथक योगदानामुळे त्यांना संगीतसूर्य म्हणून नावाजले गेले.

No comments:

Post a Comment