Saturday 13 October 2018

मुलांची गोष्ट

मुक्तीचा मार्ग
एकदा एका राजाला त्याच्या राजपुरोहिताने सांगितले की, श्रीमद्भागवताचे पूर्ण पारायण केले तर त्याच्या र्शवणाने त्याला मुक्ती मिळेल. आपल्यालाही मुक्ती मिळावी अशी राजाची इच्छा होती. त्याला हा मार्ग फारच सोपा वाटला, त्याने पारायण करविले. पारायण पूर्ण झाल्यावर स्वत: मुक्त करण्यास त्याने राजपुरोहितांना सांगितले. राजपुरोहिताची गाळण उडाली, राजाला मुक्ती कशी मिळवून द्यावी, त्याने यासाठी आठ दिवसांची मुदत मागून घेतली. त्याच्या मुलीने त्याला काळजीचे कारण विचारले, कारण ऐकून ती म्हणाली, ठीक आहे राजाच्या या मुक्तीच्या प्रश्नाचे उत्तर मी देईन. आठव्या दिवशी राजपुरोहित आपल्या मुलीबरोबर दरबारात गेले. पुरोहितकन्येने राजाला बागेत येण्याची विनंती केली. बागेत गेल्यावर तिने दोघांनाही वेगवेगळ्या झाडांना बांधले. झाडाला बांधलेल्या तिच्या वडीलांना मोकळे करण्याची विनंती तिने राजाला केली. याने राजा रागावला, चिडला व तो म्हणाला, मी स्वत:च बांधलो गेलो आहे मी काय राजपुरोहिताना मोकळे करणार. राजाचे उत्तर ऐकताच मुलगी म्हणाली, महाराज, अशाच प्रकारे प्रत्येक जीव हा कर्मबंधनाने बांधला गेला आहे. ते दुसर्‍यांना काय मुक्त करणार, प्रत्येक मनुष्य आपल्या कर्माचा हिशोब करण्यात गुंतलेला असतो मग खर्‍या अर्थाने मुक्त होण्यासाठी सद्गुरुच वाट दाखवू शकतात.

वडिलांची पुण्याई
पंडित रामप्रसाद गरीब होते. परंतु आतिथ्य करण्यात अग्रेसर होते. पंडितजींची कमाई स्वत:वर कमी आणि दुसर्‍यावर जास्त खर्च होत होती. एकदा पंडितजींच्या घरी काही पाहुणे आले. जेवणानंतर त्या लोकांनी पंडितजींना संध्याकाळच्या गाडीची तिकिटे काढण्यास सांगितले. त्यादिवशी पंडितजींकडे काहीच पैसे नव्हते. याबाबत पाहुण्यांकडे ते काहीच बोलले नाही. त्यांनी आपल्या मित्राकडे चौकशी केली पण हाती काहीच लागले नाही. ते चिंतेत बसले होते. इतक्यात खेडवळ वाटणारा वयस्कर माणूस त्यांच्याकडे आला व म्हणाला, ''रामप्रसाद पंडीत आपणच का?'' रामप्रसाद होय म्हणाले असता, वयस्कर माणसाने त्यांना त्यांच्या वडिलांचे नाव हरिप्रसाद होते का असे विचारले. रामप्रसाद हो म्हणताच त्या माणसाचे डोळे भरून आले व तो म्हणाला. ''बेटा, २0 वर्षापूर्वी तुझे वडील आणि मी एकत्र प्रवास करत होतो. त्यावेळी माझा खिसा कोणीतरी कापला व माझे पैसे लांबविले. त्यावेळी तुझ्या वडिलांनी मला पैसे दिले होते ते परत करण्यास मी आलो आहे. त्यावेळी त्यांनी जर मला मदत केली नसती तर आजचा दिवस मी पाहूच शकलो नसतो. त्यानंतर मी गावी गेलो, पै-पै साठवून त्यांचे पैसे एकत्र केले पण त्यांच्या निधनाची वार्ता मला समजली म्हणून तेव्हा जमले नाही तर आज स्वत: ते पैसे परत करण्यास मी आलो आहे.'' असे म्हणून त्याने ते पैसे पंडितजींना दिले व एकही क्षण न थांबता तो माणूस निघून गेला. पंडीतजींनी त्या पैशातून पाहुण्यांची व्यवस्था केली व ईश्‍वराचे आभार मानले.
तात्पर्य : परोपकारी वृत्ती माणसाच्या कामी येते. कधी काळी उपयोगी केलेले उपकारसुद्धा या ना त्या रूपाने परतफेड करण्यासाठी कोणी ना तयार होऊन आपले कामी येतो.

इच्छांना अंत नसतो
एक राजा प्रजेच्या सुखसुविधेकडे लक्ष द्यायचा. तरीही प्रजेकडून दर दिवसाला नवीन मागणी यायची. प्रजेला संतुष्ट ठेवण्यासाठी राजा रात्रंदिवस झटत होता. परंतु प्रजेच्या इच्छेला अंत नव्हता. अखेरीस राजा आजारी पडला. कारण तो दु:खी कष्टी राहत होता. काय केल्याने प्रजा सुखी राहील याचा तो विचार सातत्याने करत असे. अनेक वैद्यांनी राजाच्या प्रकृतीची तपासणी केली. राजावर उत्तमात उत्तम उपचार करण्यात आले, औषधपाणी करण्यात आले. परंतु, फायदा होत नव्हता. कारण राजाचे दुखणे हे मानसिक स्वरुपाचे होते. योगायोगाने एके दिवशी हिमालयातील साधू त्याच्याकडे आले. राजाने त्यांना आपली व्यथा सांगितली. राजा म्हणाला, महाराज तुम्ही परमज्ञानी आहात, माझ्यावरील संकट दूर करा. साधूंना सर्व परिस्थिती माहिती होती. राजाला शारीरिक नव्हे तर मानसिक आजार होता. तो दूर करण्याची गरज होती. त्यांनी राजाला समजावले, तुझी विचार करण्याची पद्धतच तुझी व्यथा बनली आहे. तू प्रजेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आटापिटा करतो आहेस, पण तू हे विसरतोस की, मन हे चंचल असते. मनात विविध प्रकारच्या इच्छा उत्पन्न होतच राहतात. त्यामुळे तुझी प्रजा काही ना काही इच्छा व्यक्त करणारच, तू त्यांना जितके देत जाशील तितके त्यांचा हव्यास वाढत जाईल. मनाच्या संतुष्टीला सीमा नसते. सुख इच्छेची नियंत्रित पूर्ती करण्यामध्ये आहे. तेव्हा इच्छा नियंत्रणात ठेवण्याची गरज असते. तीच सवय जनतेला लावली पाहिजे. यामुळे तू स्वत:चे मानसिक स्वास्थ्य हरवून बसला आहेस. राजाला आपली चूक लक्षात आली.
तात्पर्य : इच्छा या अमरवेलीसारख्या असतात. त्या अर्मयाद असतात, पहिली इच्छा किंवा शंभरावी इच्छा ही अर्मयादच असते, तिला मरण नाही फक्त र्मयादित ठेवणे किंवा नियंत्रण ठेवणे हेच आपल्या हातात आहे.

No comments:

Post a Comment