Thursday 18 October 2018

भास्करबुवा बखले

.मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक, संगीतकार भास्करबुवा बखले यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८६९ रोजी सुरतजवळील कठोर गावी झाला. बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे त्यांनी गायनकलेचा श्रीगणेशा केला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखाँ यांनी किलरेस्कर नाटक मंडळीत बखलेबुवांचे नाटकातील गाणे ऐकून आनंदाने बुवांची स्वत: शिकवणी घेतली. फैजमहंमदखाँ, नथ्थनखाँ आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. पर्शिमानंतर पुढे त्यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून लोक त्यांना देवगंधर्व म्हणू लागले.शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली वापरून भास्करबुवांनी मराठी नाट्यगीते संगीतबद्ध केली. किलरेस्कर व गंधर्व नाटक कंपन्यांत त्यांनी संगीत विषयाचे प्रमुख गुरू म्हणून काम केले. जालंधर, सियालकोट, कराची, म्हैसूर येथील मैफिली भास्करबुवांनी गाजवल्या.१९११ साली भास्करबुवांनी भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. त्यांनी व गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान व संगीत स्वयंवर नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय भास्करबुवा बखले यांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते.

No comments:

Post a Comment