Saturday 13 October 2018

लोहगड

पुणे जिल्हय़ातील लोहगड हा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्णकिल्ला असून ब्रिटीश सरकरने या किल्ल्याला २६ मे १९0९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गाची एक जोडगोळी उभी आहे. त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड. लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते. पलीकडेच तिकोना ऊर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे. तुंग ऊर्फ कठीणगडही येथेच आहे. अंदरमावळ आणि पवनमावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे.
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. सातशे वर्षापूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असा अंदाज निघतो. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्‍हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. १६३0 मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड-विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला.
१६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७0 मध्ये मराठय़ांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सूरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. १७१३मध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांना दिला. १७२0 मध्ये आंग्रेंकडून तो पेशव्यांकडे आला. १७७0 मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधून घेतली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८00 मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८0२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८0३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
गडावर चढतांना सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सपार्कार मार्गावरून जावे लागते. (१) गणेश दरवाजा : हय़ाच्याच डाव्या-उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहेत. (२) नारायण दरवाजा : हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई. (३) हनुमान दरवाजा : हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. (४) महादरवाजा : हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९0 ते ११ जून १७९४ या कालावधीत केले. महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गालागतो. दग्र्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्न अवशेष आढळतात. याच दग्र्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याची घाणी आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथर्‍यात बसवली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी लागते. या कोठीत राहाण्याची सोय होते. कोठीत अनेक खोल्या आहेत. दग्र्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. तेथे एक शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळे सोळाकोनी आहे. मोठा तळ्याच्या पुढे विंचूकाटाकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्‍चिमेस विंचूकाटा आहे. हा विंचूकाटा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचूकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. लोहगडावरच्या इमारती पडलेल्या आहेत. १00 लोक झोपू शकतील एवढी एक गुहासुद्धा गडावर आहे. लोहगडाचे उत्तरेकडचे टोक निमुळते होत गेले आहे.


No comments:

Post a Comment